शहदादपूर : वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील शहदादपूरमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. २२ वर्षीय जिया बाई, २० वर्षीय दिया बाई आणि १६ वर्षीय दिशा बाई यांच्या व्यतिरिक्त, या तीन बहिणींचा १३ वर्षीय भाऊ हरजीत कुमार याचे अपहरण करून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात संतापाची लाट उसळली असून मुलांच्या आईने न्यायाची मागणी केली आहे.
पीडितांच्या आईने स्थानिक संगणक शिक्षक फरहान खासखेली याच्यावर मुलांना पळवून नेल्याचा आरोप केला. मला तीन मुली होत्या आणि फरहानने त्या सर्वांना घेऊन गेला, असे तिने डोळ्यात अश्रू आणत सांगितले. आईने तिच्या १३ वर्षांच्या मुलाला परत आणण्याची विनंती केली, यावेळी त्या म्हणाल्या की, इतक्या लहान वयात धर्म समजू शकत नाही. तिने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
कुटुंबाच्या निषेधानंतर पोलिसांनी या मुलांना शहदादपूर येथील न्यायालयात हजर केले. दोन प्रौढ मुलींना आश्रयगृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले, तर एका अल्पवयीन मुली आणि मुलाला त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.