नांदेड : शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत असताना संबंधित मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यावेळी मुलीने आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकांनी तातडीने भाग्यनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत भाग्यनगर पोलिसांनी काल रात्री संशयित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्यावर अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणा-या पोक्सो कायद्यासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील ५० वर्षीय संशयित मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, मुलीचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.
या प्रकरणाचा तपास भाग्यनगर पोलिस करत आहेत. पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी घटनेला दुजोरा देत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांकडूनही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.















