छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरातील पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १३ एप्रिलपासून शहरात ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत जन आंदोलन सुरू केले. रिकाम्या हंड्यांचे तोरण, स्वाक्षरी मोहीम, पाणी की अदालत, जनजागृतीसाठी दिंडी, पालखी आणि घरोघरी पत्रके वाटत शिवसेनेच्या या आंदोलनाने पाणी प्रश्नावरून रान पेटवले आहे. पाण्यासाठीच्या या जन आंदोलनात आता युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची एन्ट्री होणार आहे.
येत्या १६ तारखेला शिवसेनेच्या जन आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाने केला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शहरातील वॉर्डनिहाय बैठकांचा धडका सुरू केला आहे. शिवसेना भवनात होत असलेल्या या बैठकांमधून मोर्चाचे नियोजन केले जात आहे.
शहरातील पाणी प्रश्नाला सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच लोकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. बारा ते पंधरा दिवसांना नागरिकांना पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात डोक्यावर हंडे घेऊन माता-भगिनींवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नवी पाणीपुरवठा योजना पूर्ण कधी होईल, हे कोणीही सांगायला तयार नाही.
नऊशे व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू नाही, त्यामुळेच लबाडांनो पाणी द्या, हे जन आंदोलन शिवसेनेने हाती घेतल्याचे चंद्रकांत खैरे यांनी नियोजनाच्या बैठकीत सांगितले. लोकांच्या मनात सताधा-यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. तो आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १६ रोजी निघणा-या मोर्चातून व्यक्त होणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खैरे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच शहरात येऊन गेले. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची जुनीच घोषणा त्यांनी नव्याने केली. पण ज्या संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते असताना शहरात जन आक्रोश मोर्चा काढला होता, त्या संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर मात्र फडणवीस यांनी एक शब्दही काढला नाही, यावरून पाणीप्रश्नावर कोण लबाडी करतंय हे उघड असल्याचा टोला खैरे यांनी लगावला.