पुणे : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात २१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५.५३ टक्के मतदान झाले. मात्र, तत्पूर्वी यंत्रांची कार्यक्षमता तपासण्यासाठी करण्यात येणा-या मॉक पोल दरम्यान जिल्ह्यात ५२ ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यासह २८ कंट्रोल युनिट आणि ४५ व्हीव्हीपॅट बंद पडल्याचे सांगण्यात आले.
प्रत्यक्ष मतदानाला सात वाजता सुरुवात झाली असली तरी त्यापूर्वी साडेपाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल घेण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. यादरम्यान सर्व मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांची कार्यक्षमता पडताळणी करण्यासाठी मॉक पोल केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर हे मॉक पोल करण्यात आले.
त्यात ५२ मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम बंद पडल्याचे दिसून आले. राखीव मतदान यंत्रांमधून हे ५२ मतदान यंत्र बदलण्यात आले तसेच २८ कंट्रोल युनिट व ४५ व्हीव्हीपॅट यंत्रही बंद पडल्याचे आढळले. राखीव साठ्यातून हे यंत्र बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्वाधिक ७ मतदान यंत्र भोर मतदारसंघात तर इंदापूर मतदारसंघात ६ मतदान यंत्र बंद पडल्याचे सांगण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ५ मतदान यंत्र बंद पडले होते. ते तातडीने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदान सात वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात अर्थात साडेसात वाजेपर्यंत एकही यंत्र बंद पडले नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय मतदानाला सुरूवात झाल्यानंतर अकोला, मालेगाव, जामनेर (जळगाव), दादेगाव (पैठण), कोल्हापूर, मनसगाव (बुलढाणा), खामगाव, जालना मतदार संघातील ‘ईव्हीएम’ काही वेळ बंद पडले होते.