मिरारोड : मिरारोड परिसरातून अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाची संतापजनक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलीचे खासगी अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ गुपचुपपणे काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सहा जणांविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मिरारोड परिसरात आईसोबत राहते आणि शालेय शिक्षण घेत आहे. जुलै २०२६ पासून आतापर्यंत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आरोपी असिफ याने मुलीचे खासगी अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ गुपचुपपणे काढल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्याने हे फोटो-व्हिडिओ आपल्या साथीदारांनाही पाठवल्याचा आरोप आहे. यानंतर असलम खान (वय २६) आणि मोनू पटेल (वय २८) यांनीही संबंधित फोटो-व्हिडिओचा गैरवापर करून मुलीला धमकावल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तर शाजिद खान (वय १९) आणि आनस अली (वय २२) यांनी फोन करून फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रॉकी (वय २३) यानेही मुलीचे फोटो-व्हिडिओ असल्याचे सांगून ते इतरांना दाखवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात मोहम्मद अनस अन्सारी (२२) आणि मोहम्मद साजिद खान (२१) यांना पोलिसांनी अटक केली आहे.















