नवी दिल्ली : एअर इंडियाच्या ४ ऑगस्ट रोजी दिल्ली-फुकेट विमानात झालेल्या टर्ब्युलन्सवर नवीन खुलासा झाला आहे. विमानात अनेक तांत्रिक बिघाड झाले होते. विमानाची हायड्रॉलिक प्रणाली तीन वेळा निकामी झाली. ऑटो पायलटही डिस्कनेक्ट झाला होता. यानंतर लगेचच सह-वैमानिकाने मॅन्युअल पद्धतीने विमानाचा ताबा घेतला.
विमानाचे अनेक इंडिकेटर स्विच काही काळासाठी बंद झाले होते. यावेळी विमानाला हवेत काही धक्केही बसले. त्यानंतर विमान अचानक तब्बल ३०० फूट खाली आले होते. विमानात १३७ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स होते. या घटनेत १७ जण जखमी झाले. या प्रकरणाची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) करत आहे. दरम्यान, फ्रान्सची एजन्सी बीईए आणि एअरबसची पथके मंगळवारी भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. ज्या ए३२० विमानात बिघाड झाला, ते फ्रान्समध्ये बनवले जाते. त्यामुळे बीईए देखील चौकशीत सहभागी होत आहे.
हायड्रॉलिक सिस्टीम खराब झाल्याने विमान खाली झुकले
एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीएआय) चे अध्यक्ष कॅप्टन सॅम थॉमस यांच्या मते, हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानंतर पायलटने विमानाचे नाक (पुढील भाग) खाली केले. यामुळे विमान सुमारे ३०० फूट खाली आले. अचानक उंची कमी झाल्याने विमानात काही काळ निगेटिव्ह-जी सारखी स्थिती निर्माण झाली. यामुळे सीट बेल्ट न लावलेले प्रवासी आणि क्रू सदस्य वर उडून आदळले. काही लोक छताला आणि ओव्हरहेड बिनला धडकले आणि जखमी झाले. कॅप्टन थॉमस म्हणाले की, अशा स्थितीत विमान स्थिर करण्यासाठी कधीकधी यापेक्षाही जास्त उंची कमी करावी लागू शकते. त्यांनी वैमानिकांच्या त्वरित कारवाईला महत्त्वाचे म्हटले.
















