शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील धामणगाव व कारेवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून सामाजिक वातावरण बिघडत आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायावर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनराज पाटील धामणगावकर यांनी दिला आहे.
‘एकमत’शी बोलताना धनराज पाटील म्हणाले की, अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून अनेक घरांमध्ये आर्थिक व कौटुंबिक संकट निर्माण झाले आहे. महिलांमध्ये व नागरिकांमध्ये या प्रकाराबाबत तीव्र नाराजी असून संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध दारूविक्री कायमची बंद करावी. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर ग्रामस्थांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. परिसरातील नागरिकांनीही अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
















