20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeसंपादकीय विशेषआनंददायी शिक्षणासाठी...

आनंददायी शिक्षणासाठी…

भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करून सुमारे तीन वर्ष होत आहेत. त्या धोरणाने सूचित केलेले बदलांची अंमलबजावणी केंद्र सरकार बरोबर विविध राज्य सरकारांनी देखील आपापल्या राज्यात सुरू केली आहे. धोरणातील काही महत्त्वाच्या बदलांचा विचार करून कार्यवाही आपल्या राज्यातही सुरू झाली आहे. धोरणात शालेय शिक्षणाचा आकृतीबंध बदलण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडीची तीन वर्ष आणि पहिली व दुसरीचे दोन वर्ष असा पाच वर्षांचा एकच स्तर निश्चित करत त्याला पायाभूत स्तर म्हटले आहे. हा नवा बदल असला तरी तो धोरणातील महत्त्वाचा बदल आहे. शालेय शिक्षणातील हा एक महत्वाचा टप्पा आहे. बालवाडीचा तीन वर्षांचा कालावधी हा शिक्षणाच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या स्तरावर बालकांचे शिकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रासाठी भविष्याचा पाया घालणारे ठरणार आहे. शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने देशातील विविध शाळांमध्ये दाखल असलेल्या परंतु तरी शिक्षणाच्या अपेक्षित क्षमता प्राप्त करू न शकणा-या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे पाच कोटी इतक असल्याचे म्हटले आहे. या मुलांचा पाया अधिक पक्का होण्याची गरज सातत्याने आजवर व्यक्त करण्यात आली आहे. मुले शिकण्यापासून दूर राहणे, शाळाबा होणे यात जी अनेक कारणे आहेत त्यापैकी बोजड अभ्यासक्रम, निरस अध्यापन प्रक्रिया ही देखील आहेत.

पायाभूत स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणून जी प्रक्रिया आराखड्यात सुचित केली आहे ती अधिक महत्त्वाची आहे. या स्तरावर क्रडन पद्धतीने पुढे जाणे घडावे अशी अपेक्षा असते. शिकणे होईल पण ताण येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. येथील शिकण्याच्या प्रक्रियेतून बालकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा. शिकण्याची अभिरूची विकसित होणे गरजेचे असते. यासाठी आराखड्यात विचार करण्यात आला आहे. त्यानुसार मुक्त, सरचित, जोडी, गट संभाषण, गोष्टी सांगणे, खेळणी आधारित अध्ययन, गाणी-बडबडगीते, संगीत आणि तालबद्ध हालचाली, कला व हस्तकला, वर्गातील खेळ, मैदानी आणि वर्गबाहेरील खेळ, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, क्षेत्रभेटी या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. आपले शिक्षण हाताची घडी तोंडावर बोट याच मार्गाने जात आले आहे. बहुतांश वेळी वर्गात शिक्षक एकटाच बोलत असतो आणि विद्यार्थी फक्त ऐकत असतात. विद्यार्थ्यांचे शिकणे परिणामकारक करायचे असेल तर शिक्षण पंचज्ञान इंद्रियाच्या मदतीने होण्याची गरज सातत्याने अभ्यासक व्यक्त करत आले आहेत. जेव्हा शिक्षणाच्या प्रक्रियेत पाचही ज्ञानइंद्रियांचा उपयोग होईल तेव्हा शिकण्यात समृद्धतेचा प्रवास सुरू होणार आहे.

आजवरच्या शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अवयव म्हणून केवळ कानाचा विचार केला आहे. उर्वरित अवयवांचे काय करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांनाच अनेकदा पडतो. अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षक एकटाच बोलत असतो आणि विद्यार्थी फक्त ऐकत असतो. अशावेळी होणारे शिक्षण समग्रतेने न होता केवळ घोकंपटटीच्या आधारे होते आहे असे मानले जाते. आज पदवीधारक असलेल्या उमेदवाराला मुलाखतीस गेल्यावर देखील संभाषण, संवाद करता येत नाही. आपल्या मनातील विचार व्यक्त करता येत नाहीत. मुळात प्रगटीकरण हे कौशल्याची गरज असताना शिक्षणातून तशी पेरणी होताना दिसत नाही. आराखड्यात विद्यार्थ्यांना मुक्त संवादाची वाट सूचित केली आहे. आपल्या अवतीभोवती अनेक लहानमोठ्या घटना घडत असतात. त्या घटनाचा विचार विद्यार्थ्यांना वयानुरूप करता यायला हवा. केलेला विचार मांडता यायला हवा. त्यामुळे मुक्त संभाषणाची संधी ही महत्त्वाची ठरणार आहे. ठरून दिलेल्या विषयावर बोलता यायला हवे.

शिक्षणात आणि विशेषता बालगटासाठी महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टींपैकी बालकांसाठीच्या गोष्टी, गाणी आणि बडबडगीते सर्वात महत्वाचे आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेत या गोष्टींनी स्थान दिले गेल्याने मुलांचे परिणामकारक शिकणे आणि भाषिक कौशल्याची वृद्धी होण्यास मदत होणार आहे. गोष्टी या शिकण्याच्या प्रक्रियेत मुलांचे भावविश्व समद्ध करणारा घटक आहे. पूर्वी हे काम घराघरातून आजी आजोबा करायचे. पण अलिकडे विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आजी, आजोबांचे आस्तित्व हरवत चालले आहे. नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर होते. त्यामुळे मुले, नवरा, बायको असे छोटेसे कुटुंब निर्माण होत आहेत. दोघेही नोकरीच्या निमित्ताने घराच्या बाहेर, थकून भागून आल्यावर घरात संवाद नाही. गोष्टी, गाणी, बडबडगीते हे तर हद्दपार झाले आहेत. गोष्टी नसल्याने मुलांचा भावनिक आणि भाषिक विकासाला मर्यादा पडत आहेत. पायाभूत स्तरावर क्षेत्रभेटीचा विचार केला गेला आहे. मुळात आपले शिक्षण चारभिंतीच्या मर्यादा सोडत नाही.

– संदीप वाकचौरे,
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR