औसा : प्रतिनिधी
संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक मानव जातीस आपला धर्म प्रिय असतो. आपल्या धर्माचे आचरण करीत असताना इतर धर्माचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वीरशैव धर्माचे आचरण आणि परंपरा याला संपूर्ण जगामध्ये अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन श्री उज्जैन पिठाचे जगदुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र, शिवाचार्य महास्वामी यांनी केले.
औसा हिरेमठ संस्थांनच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमत्ति आयोजित धर्मसभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी धर्मपिठावर संस्थानचे मार्गदर्शक डॉ. श्री शांतवीर शिवाचार्य महाराज व पिठाधिपती बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. आपल्या अमृतवाणीतून श्रीमद जगदगुरु पुढे म्हणाले की, ८५ वर्षांपूर्वी लि. निरंजन शिवाचार्य महाराज यांनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानसाधनेच्या माध्यमातून हजारो शिष्यगण निर्माण केले म्हणून त्यांची अखंड परंपरा आजतागायत सुरू आहे. प्रत्येक गुरूंनीही आपल्यावर श्रद्धा ठेवणा-या शिक्षणाच्या दु:खाचे आणि चिंतेचे निवारण करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
औसा हिरेमठ संस्थांनच्या माध्यमातून मागील आठ दशकापासून सुरू असलेली धर्माची शिकवण ही कौतुकास पात्र ठरणारी आहे, म्हणून प्रत्येक माणूस हा चालते बोलते मंदिर आणि चालता बोलता देव होऊ शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. हिरेमठ संस्थानच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा सन्मान हिरेमठ संस्थानचे महास्वामी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. धर्मसभेसाठी हजारो महिला पुरुष व युवक उपस्थित होते. यावेळी ष. ब्र. डॉ. १०८ श्री शांतवीर
शिवाचार्य महाराज यांचेही आशिर्वचन झाले.















