पंढरपूर : तालुका प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीचे श्री विठ्ठल-रुक्मिणी हे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी-कार्तिकी, चैत्री-माघी यात्राबरोबरच अगदी वर्षभरदेखील लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. वारकरी, भाविकांची सोय आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी सरकारने वाराणसीच्या धर्तीवर कॉरीडोर प्रकल्प हाती घेतला आहे. याच कॉरिडॉरला नुकतेच राज्याच्या शिखर समितीने मंजुरी दिली. त्यामुळे यात्रा काळात केवळ सहा ते सात तासांत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली.
प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरसाठी ४ हजार २५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. मात्र सुधारित आराखड्यानुसार ३ हजार ९९३.९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे भूसंपादनासाठी २ हजार २६ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी केवळ खर्च होणार आहे. ३० महिन्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी १५ दिवसांच्या काळात ३० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पंढरपूर कॉरिडॉरमुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे. चार पुरातन वास्तू बाधित होणार असल्या तरी त्यांची जपणूक करण्यात येईल. शिवाय १४ स्वागत कमानी उभारण्यात येतील. हिंदू स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यात येईल. पंढरपूर शहरात तीन हेलिपॅड उभारण्यात येतील. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षांचा विचार करून कॉरिडॉर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलाच्या शेजारी दोन नवे पादचारी पूल बांधण्यात येतील. पोलिस चौकी, पालखी तळाचा विकास, वाहनतळाची व्यवस्था आणि ५० एकर क्षेत्रातील पालखी तळाची उभारणी आदी कामांचादेखील कॉरिडॉरमध्ये समावेश असेल.
यात्रा काळात श्री विठ्ठल दर्शन लवकर होणार
मुख्यमंत्र्यांनी ३० महिन्यांच्या काळात कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या सहा महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर यात्रा काळात येणा-या भाविकांना सहा ते सात तासांत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येईल असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.
कॉरिडॉरमधील कामांचे
असे असेल नियोजन
– एक ते सहा महिन्यांत होणार भूसंपादन.
-जागा रिकाम्या करण्यासाठी लागणार चार महिने.
-बांधकामासाठी ११ ते २८ महिने, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हस्तांतरणास २९ ते ३० महिने.
-पंढरपूर शहराला जोडणारे नवे २२ मार्ग विकसित केले जाणार आहेत.
-कॉरिडॉरमध्ये स्थानिक व्यापा-यांना खालील बाजूस व्यापारी गाळे तर त्यावरील बाजूस प्रशासकीय कार्यालयांना जागा देणार.
-४८८ व्यापारी गाळ्यांचे संकुल नव्याने उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये संतपीठ, व्हीआयपी रूम, सुरक्षा, वैद्यकीय केंद्रे उभारली जाणार आहेत.
-२.२ किलोमीटर लांबी आणि १५ मीटर रुंदीचा नगर प्रदक्षिणा मार्ग विकसित होणार आहे.
-वयस्कर वारक-यांसाठी उजैनच्या धर्तीवर नदीकाठी स्रान कुंड उभारणार आहे.
-४३५ चारचाकी, ८०० दुचाकी क्षमतेचे वाहनतळ निर्माण करणार
-नगरपरिषदेची जुनी इमारत,लोकमान्य विद्यालय,नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक सहाचे जतन आणि संवर्धन होणार आहे.
-पंढरपूर परिसरात १५ स्वागत कमानी उभारणार आहे.
















