वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, सूर्याला बाहेरचा रस्ता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौ-यावरील टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ३ अत्यंत मोठे निर्णय घेतले. निवड समितीच्या बैठकीत श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, अवघ्या काही वर्षांत टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवणा-या सूर्यकुमार यादवला थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याशिवाय युवा खळबळ वैभव सूर्यवंशीची संघात निवड करण्यात आली.
भारतीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सूर्यकुमार यादवचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. एक उत्कृष्ट फलंदाज आणि यशस्वी कर्णधार म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली होती. मात्र, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे स्कायच्या कर्णधारपदाचा आणि टी-२० कारकिर्दीचा एक टप्पा संपल्याचे चित्र आहे. कर्णधार म्हणून सूर्याने ५२ सामन्यांमध्ये ४२ विजय, टी-२० विश्वचषक आणि आशिया चषक विजेतेपद जिंकले. त्याने कर्णधार म्हणून एकही मालिका गमावली नाही. या महान खेळाडूला संघातून बाहेर केल्याने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त होत आहे.
















