भारतात फुटबॉलचा खेळ सुरू होऊन सुमारे १३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरी जागतिक पातळीवर अजूनही आपण चाचपडत खेळत आहोत. स्वातंत्र्याच्या अगोदर आणि नंतर आपल्या देशात फुटबॉलची स्थिती चांगली होती. १९५२ मध्ये आपण आशियायी क्रीडा स्पर्धेत विजय मिळवला होता. मात्र १९७० च्या दशकापासून आपली पीछेहाट होऊ लागली. अर्थात अजूनही अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, खेळाडूही येत आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली पाटी कोरीच आहे. सरकार आणि अकादमीच्या पातळीवर दिल्या जाणा-या प्रोत्साहनाला कॉर्पोरेट जगाचे बळ मिळाले तर आगामी काळात प्रतिभावान फुटबॉलपटू निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
गाच्या पाठीवर प्राचीन काळापासून फुटबॉलसारखे खेळ अस्तित्वात आहेत, परंतु आधुनिक फुटबॉलचा उगम हा १९ व्या शतकात इंग्लंडमध्ये झाल्याचे मानले जाते. आधुनिक फुटबॉल हा मध्यकालीन खेळाचे बदललेले रूप होते. आज जगभरातील सर्वच देशांत फुटबॉल खेळला जातो आणि अमाप लोकप्रियता लाभलेला हा खेळ आहे. त्याचे महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने दरवर्षी २५ मे हा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तो साजरा केला जात आहे.
संयुक्त राष्ट्राचा निर्णय कौतुकास्पद असून त्यामुळे फुटबॉलची व्याप्ती वाढण्यास हातभार लागणार आहे. या खेळाला मिळणारी मान्यता आणि लोकप्रियता पाहता संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत लीबीयाने २५ मे बाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास १६० हून अधिक देशांचे पाठबळ मिळाले आणि १९३ देशांनी त्यास पाठिंबा दिला. २५ मे हा जागतिक फुटबॉल दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे याच दिवशी शंभर वर्षांपूर्वी १९२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आयोजित फुटबॉल स्पर्धेत सर्वच देशांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे पॅरिसमध्येच १९०० मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलचा समावेश करण्यात आला. दीर्घकाळापर्यंत पुरुषाचा संघ यात खेळायचा. मात्र १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये महिला फुटबॉलचा समावेश झाला. ‘फिफा’ची स्थापना १९०२ मध्ये झाली आणि कालांतराने ही संस्था जागतिक संघटना बनली. फिफाचे २११ सदस्य असून ही संख्या संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांपेक्षा अधिक आहे.
आधुनिक फुटबॉलची अधिकृत पायाभरणी १८६३ मध्ये इंग्लंडमध्ये फुटबॉल असोसिएशनच्या रूपातून झाली आणि त्यात खेळाचे प्राथमिक नियम तयार करण्यात आले. याच काळात भारतासह जगातील अनेक देशांत ब्रिटिशांच्या वसाहती होत्या आणि त्यांची राजवट होती. साहजिकच इंग्रजांबरोबरच आधुनिक फुटबॉलने भारतासह अनेक देशांत शिरकाव केला आणि तो लोकप्रिय खेळ झाला. आपल्या देशात डुरंड कप ही सर्वांत जुनी स्पर्धा मानली जाते. आशिया खंडातील देखील सर्वांत जुनी स्पर्धा होय. पहिल्यांदा त्याचे आयोजन १८८८ मध्ये शिमल्यात करण्यात आले होते. जुन्या गोष्टीचा विचार केला तर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वांत जुनी राष्ट्रीय स्पर्धा म्हणून त्याकडे पाहिले जाते. या स्पर्धेचे जनक ब्रिटिश राजनैतिक अधिकारी सर हेन्री मोर्टिमर डुरंड होते. अर्थात फुटबॉलला बळकटी कोलकाता येथून मिळाली आणि तीच भारतातील फुटबॉलची राजधानी म्हणून ओळखली गेली. कोलकाता इंग्रजांची देखील राजधानी होती. कोलकाता येथे मोहन बागान, ईस्ट बंगला, मोहमेडन स्पोर्टिंग यासारखे क्लब सुरू झाले आणि तेथून नामांकित मोठमोठे खेळाडू बाहेर पडले.
आज लहान-मोठ्या फुटबॉल क्लबच्या आणि अकादमींच्या संख्येचा विचार केल्यास ती ५० हजारांपेक्षा अधिक आहे. जुन्या खेळाडूंत पी. के. बॅनर्जी, अरुण घोष, सेलेन मन्ना, तुलसीदास बलराम, मोहंमद सलीम, पीटर थंगराज, मेवालाल, करीम, जर्नल सिंह यांसारख्या नावांचा उल्लेख करता येईल. नवीन पिढीतील खेळाडूंत सुनील छेत्री, सुब्रत पाल, वायचुंग भुतिया, लालपेखलुआ, गुरप्रीत संधू, संदेश झिंगन, तेलम सिंह, धीरज सिंह, प्रणय हलदर, कुमाम सिंह, आशिक कुरुनिया यांनी आपल्या खेळाच्या कौशल्यावर लोकप्रियता मिळवली. सुनील छेत्रीने तर भारताकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आहे. स्वातंत्र्याच्या अगोदर आणि नंतर आपल्या देशात फुटबॉलची स्थिती चांगली होती आणि आपला राष्ट्रीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप पाडणारा होता. १९५२ मध्ये आपण आशियायी क्रीडा स्पर्धेत विजय मिळवला होता. देशात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते, देशभरात अनेक प्रतिभावान खेळाडू उदयास येतात. मात्र १९७० च्या दशकापासून आपली पीछेहाट होऊ लागली. अर्थात अजूनही अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, खेळाडूही येत आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली पाटी कोरीच आहे.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत नसल्याने आणि जागतिक करंडक पात्रता फेरीतच गारद होत असल्याने आपले मनोधैर्य आणि आत्मविश्वास खचलेला आहे. त्याचवेळी क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकल्याने आणि सतत यश मिळाल्याने त्याची लोकप्रियता वाढत गेली अणि तरुणांचा कल क्रिकेटकडे वळला. फुटबॉलच्या बाबतीत जे घडले, तेच हॉकीतही घडले. त्यातही आपण मागे पडू लागलो. वास्तविक हॉकीमध्ये एकेकाळी भारताने हुकुमत गाजवली आहे. गेल्या चार दशकांपासून ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकांपासून वंचित आहोत. अर्थात फुटबॉलच नाही तर अनेक खेळांतही जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करण्याची क्षमता भारतीय खेळाडूंत आहे आणि ती काही प्रमाणात दिसतही आहे.
मात्र फुटबॉलच्या मैदानात आपल्याला कामगिरी करायची असेल तर नियोजनबद्ध रीतीने आणि व्यापक पातळीवर प्रयत्न करावे लागतील. वास्तविक देशात फुटबॉल क्लब आणि अकादमींची संख्या लक्षणीय आहे. परंतु त्यांना संघटित करणे आणि परस्पर सहकार्य वाढविण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवर अकादमींची स्थापना करणे गरजेचे आहे. जेणेकरून नव्या प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. निवृत्त झालेल्या फुटबॉलपटूंची मदतही याकामी घ्यायला हवी. त्यांचा अनुभव आणि कौशल्याचा लाभ नव्या पिढीला मिळवून देण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यांच्या भेठीगाठी घडवून आणणे फायद्याचे ठरू शकते. फुटबॉलच्या विकासात एक सर्वांत मोठे आव्हान म्हणजे प्रशिक्षकाचा अभाव. यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या देशातील सर्व खेळांत पैसा आला असेल, लोकप्रियता वाढली असेल तरीही खेळ संस्कृतीचा अभाव आहे. यासाठी मैदानाची संख्या पुरेशी असणे अपेक्षित आहे.
-अनादी बारुआ, फुटबॉल प्रशिक्षक