रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील गरसुळी परिसरात रानडुकरांनी ऊस शेतीत अक्षरश: धुमाकूळ घालत अनेक शेतक-यांच्या उभ्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या सततच्या हल्ल्यांमुळे ऊस उत्पादक शेतकरी भयभीत झाले असून त्यांना आर्थिक फटका बसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गरसुळी (ता. रेणापूर) परिससरात शेतक-यांनी ऊसाची लागवड केली आहे रात्रदिवस कष्ट करून ऊसाची वाढ केली आहे केली खरी मात्र रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप शेतात घुसून उसाची मोडतोड करत असल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे.
अनेक ठिकाणी उसाची पाने, खोडे व मुळे उकरून टाकल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या धुमाकुळात बाळासाहेब अंकुश चव्हाण, मेघाबाई गोविंद चव्हाण, भागवत भोजन देशमुख, काकासाहेब दामोदर चव्हाण, भरत पांडुरंग देशमुख, सुरेश संभाजी चव्हाण, प्रशांत बन्सी चव्हाण, संदिपान दौलत कातळे, तुकाराम देशमुख, श्याम नामदेव चव्हाण यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतक-यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतक-यांनी रात्रभर शेतात थांबून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी रानडुकरांचा उपद्रव थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेती करणे कठीण बनत असल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी गरसुळी परिसरातून जोर धरत आहे.
















