नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने चांद्रयान ४ च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण केली आहे. चांद्रयान मिशन-४ वर्ष २०२७ मध्ये सुरू होईल, या मोहिमेद्वारे चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. चांद्रयान-४ हे उच्च क्षमतेच्या ‘एलएमव्ही-३’ रॉकेटद्वारे दोन वेगवेगळ्या प्रक्षेपणांमध्ये पाच वेगवेगळे घटक घेऊन जाईल, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
चांद्रयान-४ मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे आहे. गगनयान मोहीम पुढील वर्षी सुरू होईल. यामध्ये, भारतीय अंतराळवीरांना एका विशेष वाहनातून अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवले जाईल आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले जाईल.
भारत २०२६ मध्ये समुद्रयान देखील प्रक्षेपित करेल. यामध्ये तीन शास्त्रज्ञ समुद्राच्या तळाचा शोध घेण्यासाठी पाणबुडीतून ६,००० मीटर खोलीवर जातील. ही कामगिरी गगनयान अंतराळ मोहिमेसह भारताच्या ऐतिहासिक मोहिमांची कालमर्यादा निश्चित करेल.
समुद्रयानच्या माध्यमातून महत्त्वाची खनिजे, दुर्मिळ धातू आणि अज्ञात सागरी जैवविविधतेची माहिती गोळा केली जाईल. गगनयान प्रकल्पाचे मानवरहित मिशनही यावर्षी पाठवले जाईल. यामध्ये व्योम मित्रा या रोबोटचा समावेश आहे.
प्रक्षेपण स्थळाचा विस्तार
इस्रोची स्थापना १९६९ मध्ये झाली. पण पहिला लाँच पॅड उभारण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला तो १९९३ पर्यंत. यानंतर, दुसरे लाँच पॅड २००४ मध्ये बांधले, त्यानंतर त्याला एक दशक लागले. तर गेल्या १० वर्षांत, भारतीय अवकाश क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक वाढली आहे. आम्ही आता पहिल्यांदाच जड रॉकेटसाठी तिसरे प्रक्षेपण स्थळ बांधत आहोत. लहान उपग्रहांसाठी, श्रीहरिकोटा प्रक्षेपण स्थळाचा विस्तार तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यात एका नवीन प्रक्षेपण स्थळासह केला जात आहे.