लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांच्या सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये भाव द्यावा, शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे-पाटील दि. १८ सप्टेंबरपासून औसा तहसील कार्यालयासमोर बेमुद उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाच्या १४ व्या दिवशीही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे छावा संघटनेच्या वतीने दि. ३० सप्टेंबर रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. त्यामुळे सौदाही निघू शकला नाही.
शेतक-यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी १८ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली. उपोषणाच्या १४ व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली तरी शासनाने या उपोषणाची आणि मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे छावा संघटनेने सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेऊन विजयकुमार घाडगे-पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानूसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आडते, हमाल, मापाडी, हमाल यांनी बाजार समिती बंद ठेवून घाडगे-पाटील यांच्या मागण्या आणि उपोषणाला पाठींबा दिला.
दहा वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी सोयाबीनला ६ हजार रुपये भाव द्यावा म्हणून पायी दिंडी काढली होती. मात्र स्वत: ते मुख्यमंत्री राहिले व आज उपमुख्यमंत्री आहेत सोयाबीनचा दर त्यांनी कुठे नेवून ठेवला हे तपासण्याची वेळ आली आहे. आज सोयाबीनचा भाव सोयाबीन उत्पादक शेतक-यांना परवडत नाही. सोयाबी लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. या शेतक-यांच्या सोयाबीनला ८ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी भाव मिळावा, शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी विजयकुमार घाडगे बेमुदत उपोषण करीत आहेत.
या उपोषणाला लातूरच्या मार्केट यार्डातील सर्वच घटकांनी सोमवारी व्यवहार बंद ठेवून पाठींबा दिला आहे. व्यापारी, आडते, हमाल, गाडीवान, हमाल यांनी आपापले व्यवहार बंद ठेवावेत, यासाठी छावाचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे, रेणापूर तालुकाध्यक्ष बाजीराव एकुर्के, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज फेसाटे, निलंगा तालुकाध्यक्ष दास साळूंके, जिल्हा संघटक अंकुश शेळके, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सुदर्शन ढमाले, तालुका संघटक केशव पाटील, कैलास शिंदे, विष्णु करे, महेश विश्वास यांनी प्रयत्न केले.