जळकोट : ओमकार सोनटक्के
अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतक-यांना ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याच्या निर्णयावरून शेतक-यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिकांचे नुकसान मोठे, शेतीवरील खर्च प्रचंड आणि हातात उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत अवघ्या ५ हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
तालुक्यातील शेतक-यांनी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. अनेकांनी पीक कर्ज काढून शेती केली. मात्र, अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्न आहे. त्यातच दिवाळीचा सण आल्याने घरखर्च, मुलांचे कपडे, किराणा आणि इतर खर्च भागविण्याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.
५ हजारात शेतक-यांची कोणती अडचण दूर होणार?
शेतक-यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने खरीप हंगामाची पेरणी केली होती. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना ५ हजार रुपयांची मदत शेतक-यांच्या कोणत्या अडचणी दूर करणार? दिवाळीच्या तोंडावर शेतक-यांना भरीव आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. शासनाने शेतक-यांच्या परिस्थितीचा विचार करून मदतीची रक्कम वाढवावी.
-दत्तात्रय पवार
शेतक-यांना पुरेशी हवी
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी वारंवार अडचणीत सापडत आहेत. यंदा पिकांचे नुकसान झाल्याने शेतक-यांच्या हातात पैसा उरलेला नाही. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतक-यांच्या समस्या सुटणार नाहीत. शासनाने प्रत्यक्ष पंचनामे आणि नुकसानीचा आढावा घेऊन शेतक-यांना पुरेशी नुकसानभरपाई द्यावी.
-बाबूराव जाधव
कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?
शेतक-यांना पाच हजार रुपये अग्रीम देण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले असताना पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? शासनाने शेतक-यांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तुटपुंजी मदत न देता भरीव आर्थिक मदत द्यावी.
-गजेंद्र टाकळे
जास्तीत जास्त मदत द्यावी
शेतीसाठी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च झाले आहेत. पाऊस वेळेवर न झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. आता उत्पन्न मिळण्याची आशा कमी झाली आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? घर खर्च भागवायचा की शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे, असा प्रश्न आहे. शासनाने आमच्या नुकसानीची दखल घेऊन जास्तीत जास्त मदत द्यावी.
-शामसुंदर पाटील















