लातूर : प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि सांघिक कार्याच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, दर्जी बोरगाव येथील केंद्रीय मुख्याध्यापक परमेश्वर विमल चंद्रकांत बालकुंदे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. विनोबा अॅपच्या वतीने दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असून, रेणापूर तालुक्यातून हा सन्मान मिळवणारे ते एकमेव शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे दर्जी बोरगाव शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव झाला असून, संपूर्ण तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
रेणापूरचे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया, शिक्षण विस्तार अधिकारी सुदर्शन लहाने यांनी विनोबा अॅपचे जिल्हा समन्वयक शुभम कांबळे यांच्या समवेत थेट शाळेत भेट देऊन मुख्याध्यापक बालकुंदे यांचा विद्यार्थ्यांसमोर व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत गौरव केला. विशेष म्हणजे, अधिका-यांनी शाळेत येऊन केलेला हा सत्कार केवळ एका मुख्याध्यापकाचा सन्मान नसून, शाळेतील प्रत्येक शिक्षकाच्या परिश्रमांचा, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आणि सामूहिक शैक्षणिक प्रयत्नांचा गौरव ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रतिभा चंबीले होत्या. यावेळी बळीराम येमते, योगिता गणेश कटके उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया म्हणाले की, गेल्या एका वर्षात शाळेच्या कामकाजात लक्षणीय प्रगती दिसून आली आहे. या प्रगतीचे संपूर्ण श्रेय शाळेच्या टीमवर्कला जाते. मुख्याध्यापकांचा सत्कार विद्यार्थ्यांसमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीसमोर व्हावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आदर्शातून प्रेरणा मिळेल, या उद्देशाने आपण मुद्दाम शाळेत उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शुभम कांबळे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर बालकुंदे यांनी केले. सूत्रसंचालन गिरिजा लोंढे यांनी केले, तर आभारप्रदर्शन काशीबाई साने यांनी केले.
















