लातूर : प्रतिनिधी
आपल्या देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व तत्सम शाखेतील विद्यार्थ्यांना व्यवसाय किंवा नोकरी मिळविण्याआधी त्यांना त्या विषयाचे सखोल शास्त्रीय ज्ञान आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवा या दृष्टिकोनातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा ऑन जॉब ट्रेनिंगची संकल्पना अभ्यासक्रमामध्ये मांडण्यात आली आहे. यामुळे पुस्तकी ज्ञानासोबत ओजीटी उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनवणार असल्याचे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रशिक्षण व इंटर्नशिप विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणा-या नऊ महाविद्यालयातील ओजीटी समन्वयक, सह-समन्वय आणि प्राध्यापकांसाठी महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. सभागृहामध्ये आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक राजेश्वर पाटील, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ.सुजाता चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.एम.प्रयास, प्राचार्य डॉ.पी.बी.गोर, नोडल अधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे आणि सहाय्यक समन्वयक प्रा.रामेश्वर देव्हडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणासोबत दैनंदिन व्यवहाराचे शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आसल्याचे सांगून सांगवे म्हणाले की, जपानमध्ये आठव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान दिले जाते, त्याच दृष्टिकोनातून आपणही आपल्या देशामध्ये पुस्तके ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान जागृत होऊन आपले राष्ट्र विकसित होईल असेही ते म्हणाले. यावेळी रेवडकर म्हणाले की, लातूर शहर हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे बाजारपेठेचे ठिकाण आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे.
यावेळी पाटील टाकळीकर म्हणाले की, बाराव्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी पन्नास विविध प्रकारच्या उद्योगाची माहिती सर्वसामान्य लोकांना दिली होती. आजही बसवकल्याण येथे उद्योग विश्व केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने उद्योग विश्व निर्माण केले जात आहे. आज विद्यार्थ्यांना शास्त्रीय आणि कौशल्यपूर्ण दृष्टिकोनातून व्यवसायभिमुख शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाभिमुख शिक्षणाची सुविधा प्राचीन काळामध्ये उपलब्ध असल्याची माहिती आपल्याला आहे. दुस-या सत्रामध्ये प्रा.रामेश्वर देव्हडे यांनी विद्यापीठाने दिलेले विविध प्रपत्र यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी केले तर आभार डॉ.डी.आर.भुरे यांनी मानले.
















