लातूर : प्रतिनिधी
शहरात फिरणा-या मोकाट, भटक्या श्वांनावर आवर घालण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने येथील साई नाका परिसरात श्वान निर्बीजीकरण व लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी दरमहा सरासरी २८० श्वांनांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. तसेच रेबीज होऊ नये याकरीता दर आठवड्याला म्हणजेच दर शनिवारी मोकाट श्वान व पाळीव श्वान यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून सद्यस्थितीत एक डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध आहे. शहरातील ज्या भागात तक्रारी प्राप्त होतात त्या भागात पहाटेच्या वेळेला डॉग कॅच केले जातात. दररोज १५ ते २० श्वान लातूर शहरातून पकडले जातात. जे श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी पात्र असतील, अशा श्वानाची शस्त्रक्रिया पार पाडली जाते. पाच ते सात दिवसांच्या ऑब्झर्वेशन कालावधीनंतर शस्त्रक्रिया केलेले श्वान ज्या भागातून पकडले आहेत, त्याच भागात परत सोडण्यात येतात. ही सर्व प्रक्रिया अॅनिमल बर्थ कंट्रोल अॅक्ठ २००३ मधील तरतूदीचे तंतोतंत पालन करुन पार पाडली जाते. श्वानाने मनुष्याचा चावा घेतल्यानंतर जखमेला वाहत्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे. चुना लावणे, शेणखत लावणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. लातूर शहर महानगरपालिका अंंतर्गत कार्यरत सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये अॅटी रेबीज लस उपलब्ध आहे.
त्या ठिकाणी जाऊन डॉक्टरांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार लस घ्यावी. जखमेतून रक्तप्रवाह होत असेल तर अॅटी रेबीज सीरम देणे गरजेचे आहे. याची व्यवस्था श्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपलब्ध आहे. या गोष्टीचा अवलंब केल्याने मनुष्याला रेबीज या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, अशी माहिती मनपाच्या संबंधीत विभागाने दिली. तसेच एखादे श्वान पिसाळले असेल तर तात्काळ डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ ९४२००२२४९३ डॉ निवृत्ती देशमुख ८८३०००७०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.