35.5 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeनांदेडनांदेडमध्ये पंधरवड्यात आगीची तिसरी घटना; तीन कोटींची मालमत्ता खाक

नांदेडमध्ये पंधरवड्यात आगीची तिसरी घटना; तीन कोटींची मालमत्ता खाक

नांदेड : प्रतिनिधी
एप्रिलच्या दुस-या आठवड्यापासून उष्म्याची तीव्रता वाढत चाललेली असतानाच, नांदेड शहरात मोठ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गेल्या पंधरवड्यातील तिसरा अग्निप्रलय सोमवारी मध्यरात्री बघायला मिळाला. कोट्यवधींची मालमत्ता खाक करणा-या या भीषण आगीत सुदैवाने जीवित हानी झाली नाही; पण अग्निशमन दलाच्या आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

शहरातील महावितरण विभागाच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या पांपटवार सुपर मार्केटला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याचा संदेश स्थानिक अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर या विभागाचे प्रमुख के. एस. दासरे व इतर अधिका-­यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सुपर मार्केटमध्ये तब्बल १२ गॅस सिलिंडर असल्याचे समजल्यानंतर ते तात्काळ बाहेर काढण्यात आले. तसेच मार्केटच्या वरच्या भागात राहणा-­या सहा जणांना अगोदर बाहेर काढत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू करण्यात आले.

पांपटवार सुपर मार्केटमध्ये किराणा, भुसार, मिरची-मसाल्यांसह खाद्यतेलाचा साठाही होता. त्यातच दुकानातील वातानुकूलित यंत्रणेचा कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. तब्बल आठ तास शर्थीचे प्रयत्न आणि २२ अग्निशमन बंबांचा वापर केल्यानंतर सकाळी ही आग आटोक्यात आली. अग्निशमन विभागाकडे मिळालेल्या माहितीनुसार वरील दुर्घटनेत सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तीन मोटारसायकली होत्या. त्या वेळीच बाहेर काढण्यात आल्या

वरील घटनेनंतर एकाच कुटुंबात १२ गॅस सिलिंडर आढळून आल्यामुळे तो चौकशीचा विषय झाला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आणि नंतर पसरली, असे संबंधितांचे म्हणणे आहे. शहरातल्या देगलूर नाका परिसरात मागील आठवड्यातच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनाला आग लागली होती. त्यात ३० लाखांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याच्या काही दिवस आधी शहरालगतच्या मालटेकडी परिसरात फर्निचरच्या एका गोदामाला लागलेल्या आगीतही मोठे नुकसान झाले होते. गेल्या पावणेदोन महिन्यांत नांदेड शहरात मोठ्या आगीच्या चार, साधारण आगीच्या सहा, डम्पिंग ग्राऊंडवरील आगीच्या दोन, महावितरणच्या रोहित्रांना आग लागण्याच्या सहा घटनांची नोंद झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR