परभणी : बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या सोरटी सोमनाथ येथील एक हजार वर्ष जुने मुळ शिवलींग परभणी नगरीत दि.१७ एप्रिल रोजी आणण्यात येणार आहे. या शिवलिंगाचे दर्शन परभणीकरांना सप्तपदी मंगल कार्यालय, महेंद्र नगर, पारदेश्वर मंदिराच्या पाठीमागे येथे घडणार आहे. आर्ट ऑफ लिविंग परीवार परभणीतर्फे हे शिवलींग परभणीत आणण्यात येत आहे.
जवळपास एक हजार वर्षापूर्वी मोहम्मद गजनीने आक्रमण करून सोमनाथ येथील मूळ शिवलिंग खंडीत केले. यावेळी खंडीत शिवलिंगाचे काही अवशेष काही संतानी दक्षिण भारतात नेले आणि जपून ठेवून त्यांना परत शिवलिंगाचा आकार दिला. जवळपास एक हजार वर्ष या शिवलिंगाची पुजा केली. मात्र याबाबत त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही.
दरम्यान शंभर वर्षापूर्वी कांची येथील शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांनी पुढील शंभर वर्षांनरी हे शिवलिंग जगासमोर प्रकट करा असा आदेश दिला. त्यानुसार सदर शिवलिंगाचे शेवटचे संरक्षक सीताराम शास्त्री यांनी हे शिवलिंग आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक प.पू. गुरूदेव श्रीश्री रविशंकरजी यांना देवू केले. याच वर्षी महाशिवरात्रीला या शिवलिंगावर रूद्राभिषेक करून प.पू. गुरूदेव रविशंकरजी यांनी हे शिवलिंग सर्व सामान्य भाविक भक्तांसाठी खुले केले.
तेच मूळ शिवलिंग दि.१७ रोजी परभणी शहरात येणार असल्यामुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व भाविक भक्तांनी संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत सह परीवार दर्शनाला येण्याचे आवाहन आर्ट ऑफ लिविंग परीवार परभणीच्या वतीने करण्यात आले आहे.