पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतक-यांना नेहमीच फुकट लागतं असे म्हणतात. पण त्यांच्या मुलाला देताना १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत कशी दिली जाते. या ३०० कोटी रुपयांवरील स्टँप ड्युटी ४८ तासांत माफ होते. तुम्हाला का सर्व फुकट लागते, असा सवाल करत शिवसेना (ठाकरे) नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
पुण्यातील एका जमिनीच्या व्यवहारामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग एलएलपी कंपनीला तब्बल १८०४ कोटी रुपयांचा बाजारभाव असलेली जमीन फक्त ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील सरकारी मालकीच्या ४० एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या जमिनीचा भाव कागदावर ३०० कोटी रुपये इतका आहे. ही सरकारी किंमत असून खरी किंमत त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे दानवे म्हणाले. ही जमीन अमेडिया कंपनीने खरेदी केली आहे. अमेडिया कंपनीचे मालक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील आहेत. या प्रकरणामुळे अजित पवार आणि पार्थ अडचणीत आले आहेत.
देवाभाऊ की मेवाभाऊ?
अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यात नेमकं काय सुरू आहे. राज्यात देवाभाऊचे सरकार आहे की ते मेवाभाऊ आहेत? असा सवाल त्यांनी केला. पार्थ पवार यांच्या कंपनीला जमीन देण्यासाठी दोन दिवसांत फाईल पुण्यातून मुंबईत येते आणि उद्योग विभागाकडून त्याला मंजुरी दिली जाते. १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये फक्त स्टँप पेपरवर खरेदी केली जाते. एवढ्या वेगाने जर काम होत असेल तर हे सामान्य माणसासाठी का होत नाही?
जमिनी परत कराव्या लागतील
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाची जमीन घशात घालायची हा अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? असाही सवाल त्यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमधून केला.
माध्यमांसोबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणतात की जमीन अजून आमच्या ताब्यात आहे. जर अशा प्रकारे त्यांनी जमीन परत केली असेल तर राज्यातील सर्वच ठिकाणी अशा प्रकारे जमिनी परत कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.

