मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आणि मुंबई-पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. देशाच्या गृह खात्याच्या अधिकृत अहवालानुसार वाढत्या गुन्ह्यांमध्ये पुणे शहर देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईत सेलिब्रेटींच्या घरांची रेकी होते, घरात बुलेटप्रूफ काचा बसवण्याची नामुष्की कलाकारांवर असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मुंबईत घेतलेल्या सविस्तर पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, दुष्काळग्रस्तांना जाहीर केलेली ५,००० रुपयांची तोकडी मदत, बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान पीडीसीसी बँकेचा झालेला कथित गैरवापर आणि सेलिब्रिटीजच्या सुरक्षेवरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
अभिनेता टायगर श्रॉफ आणि सलमान खान यांच्या घराबाहेरील घटनांचा संदर्भ देत खासदार सुळे म्हणाल्या, टीव्ही चॅनेल्सवर एका बाजूला अभिनेते आणि दुस-या बाजूला हल्लेखोर दाखवले जात आहेत. अक्षय कुमार यांच्या घराच्या काचा बदलून तिथे बुलेटप्रूफ काचा बसवाव्या लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात नागरिकांना स्वत:च्या घरात सुरक्षित वाटत नसेल, तर हे अत्यंत चिंताजनक आहे.
सॉफ्ट डिप्लोमसीचे नुकसान
अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान किंवा अक्षय कुमार हे केवळ अभिनेते नसून भारताचे आंतरराष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. ते परदेशात भारताची ‘सॉफ्ट डिप्लोमसी’ आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचे काम करतात. अशा राष्ट्रीय आयकॉन्सची सुरक्षा करण्यात हे ‘डबल इंजिन’ सरकार अपयशी ठरत आहे. तुरुंगात बसलेली व्यक्ती गोळीबाराची कबुली देते आणि पोलीस काहीच करू शकत नाहीत, यावर संसदेच्या आगामी अधिवेशनात आम्ही जाब विचारणार आहोत.
हेक्टरी १ लाख भरपाई द्या!
दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी जाहीर केलेल्या शासकीय मदतीवर बोलताना त्यांनी आकडेवारी मांडली. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे ६,००० रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे ६,००० रुपये असे वर्षाला १२,००० रुपये शेतक-यांना मिळायला हवेत. राज्य सरकारने शेवटचा हप्ता १३ मार्च रोजी दिला होता; त्यानंतर नवीन आर्थिक वर्षातील ४,००० रुपये अद्याप शेतक-यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे थकीत ४,००० आणि आताचे ५,००० असे एकूण ९,००० रुपये शेतक-यांना देणे सरकारचे कर्तव्यच आहे.
















