छत्रपती संभाजीनगर : पदवीपर्यंत शिकलेला हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास)ने अवघ्या ११ महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपये हडपले.
विभागीय क्रीडा संकुलासाठी आलेल्या या निधीतून त्याने स्वत:सह प्रेयसीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट्स, विदेशी बनावटीच्या गाड्या खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हर्षकुमार एका सराफाला सोने खरेदीसाठी मोठी रक्कम देऊन पसार झाला आहे.
विभागीय क्रीडा संकुलामध्ये रविवारी कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला. दिशा फॅसिलिटीज कंपनीमार्फत हर्षकुमार व अटकेत असलेली यशोदा शेट्टी हे दोघे लेखा लिपिक म्हणून कंत्राटी पद्धतीवर नियुक्त होते. विभागीय क्रीडा संकुलासाठी शासनाकडून दरवर्षी निधी प्राप्त होतो. हर्षकुमार व शेट्टी हे दोघेच कॅशबुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेशी पत्रव्यवहार, खात्याचे स्टेटमेंट मागविणे, रेकॉर्ड ठेवण्याची कामे करत. संकुलाच्या क्रीडा समितीच्या खात्यात २०२३-२०२४ या कालावधीसाठी ५९ कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचा निधी जमा होता. यापैकी ३७ कोटी ७१ लाख ८२ हजार रु. खर्च झाले. मात्र, उर्वरित २२ कोटी ८९ लाख १० हजार ४७३ रुपयांपैकी हर्षकुमारने २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये ढापले.
शब्दात बदल करून ई-मेल तयार
हर्षकुमार संगणकाच्या कामात तरबेज आहे. त्याचा फायदा घेत त्याने विभागाच्या मूळ ई-मेल आयडीप्रमाणेच एका शब्दात बदल करून दुसरा ई-मेल आयडी तयार केला. उपसंचालकांच्या जुन्या लेटरहेडच्या माध्यमातून त्याच ई-मेल आयडीद्वारे बँकेला नेट बँकिंग सुरू करण्यासाठी मेल केला व कोट्यवधीची रक्कम हडपली.
दोन मैत्रिणींवर पैसा उडविला
हर्षकुमारने विमानतळ परिसरात एका आलिशान सोसायटीत नुकताच एक चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट खरेदी केला. दुसरा २ बेडरूमचा आलिशान फ्लॅट एका मैत्रिणीच्या नावावर घेतला. त्याशिवाय गेल्या चार महिन्यांमध्ये त्याने १.३० कोटींची बीएमडब्ल्यू कार, ३२ लाखांची बीएमडब्ल्यूची दुचाकी, यशोदाचा पती जीवन कार्यप्पा विंजडा ऊर्फ बी. के. जीवनच्या नावावर २७ लाखांची चारचाकी खरेदी केली. त्याच्या एका बँक खात्यात तीन कोटींची एफडी आढळली असून, चार बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत. बीएमडब्ल्यू कार पोलिसांना सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सापडली.