लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले बाजार समितीत गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्याची आवक मंदावली असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. मागील काही दिवसापुर्वी जिल्ह्यात बहुत:श भागात मुसळधार तर काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने शेतीतील भाजीपाला संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारात येणारी भाजीपाल्याची आवक मंदावली असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे व्यापारी मिन्हाज बागवाण यांनी एकमतशी बोलताना सांगितले.
सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने, मध्यम वर्ग व गरिबांना महागाईचा फटका बसत आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. यावर्षी पावसामध्ये उघडझाप असल्यामुळे भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भावात प्रचंड तेजी आली आहे. १२० रुपयाला लसूण पावभर मिळत आहे. तर अद्रक, कांदे, मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, फुलकोबी, कोथिंबीर यांचे भाव कडाडले आहेत. इतर भाजीपालाही महाग झाला आहे. जवळपास सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढत असताना टोमॅटोच्या भाववाढीमुळे भाजीतून टोमॅटो गायब होत आहेत. रोजच्या आहारातील कांद्याचे भाव सुद्धा गगनाला भिडत असल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला असला तरी दलालांनी त्यालाही अंधारात ठेवून आपलं चांगभलं केले आहे. वातावरणातील नैसर्गिक चक्राच्या बदलामुळे भाजीपाल्याला मोठा फटका बसत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटो ६० रुपये किलो, अद्रक २५० रुपये, मिरची २०० रुपये, कोंिथबीर ४०० रुपये, गवार १०० रुपये, कारले ८० रुपये, दोडका ५० रुपये, पालक ४० रुपये, भोपळा ६० रुपये, वरणा ५० रुपये, लिंबू ७० रुपये, काकडी ८० रुपये, कारले ४० रुपये, बिट ८० रुपये, शेवग्याच्या शेंगा १०० रुपये, भेंडी ८० रुपये दराने विक्री केली जात आहे.