30.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री छगन भुजबळ नाराज?

मंत्री छगन भुजबळ नाराज?

सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून अजित पवार गटात धुसफूस

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मंत्री छगन भुजबळ पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ यांच्या नाराजीचा सूर कमी आहे, परंतु नाराजी कायम असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते. त्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पदावर भुजबळांची नजर होती. भुजबळ ओबीसी असल्याने पुन्हा एकदा उमेदवारी डावलल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी नाकारली गेल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, उमेदवारी घोषित होण्यासाठी लागणारा विलंब पाहून भुजबळ यांनी माघार घेतली होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली. नाशिकमध्ये लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहेत.

प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराने अर्ज भरला आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीने छगन भुजबळ नाराज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्याने छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्नही छगन भुजबळांनी अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जातेय असाही सवाल छगन भुजबळांकडून करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत नाराजी नाट्याचा अंक रंगल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR