कंधार:प्रतिनिधी
पेटती मशाल घेऊनी हाती, वाजवावी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या विजयाची तुतारी, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमितभैय्या विलासराव देशमुख यांनी कंधार येथे लातूर लोकसभा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले आहे.
लातूर लोकसभा मतदार संघाचे इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ आज दि. २९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हा परिषद हायस्कूल मैदान येथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला अहिल्याबाई होळकर यांची वंशज श्रीमंत भूषणसिंह होळकर, नांदेड लोकसभा उमेदवार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, गुरुनाथराव कुरुडे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला अध्यक्ष आशा श्यामसुंदरजी शिंदे, श्रीमती आशा भिसे, सुभाष रायबोळे, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर,माजी सनदी अधिकारी अनिलजी मोरे, शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, शिवसेना (उबाठा गट) महाराष्ट्र संघटक एकनाथ पवार, प्रा. रामचंद्र भरांडे, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, अॅड मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ.पुरुषोत्तम धोंडगे, मा. जिप सदस्य रामचंद्र येईलवाड, माजी नगराध्यक्ष शहाजी नळगे,काँग्रेसचे शहराध्यक्ष महंमद हमीद महंमद सुलेमान,यांच्यासह महाविकास आघाडी मधील विविध पक्षाचे नेते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. अमितभैया देशमुख म्हणाले नांदेड – लातूरचं नातं हे निवडणुकीच्या माध्यमातून माध्यमातून घट्ट झालं आहे, या नात्याला लातूरकर कधीही तडा जाऊ देणार नाहीत, येथील मतदारांना केवळ आम्ही मते मागण्यासाठी आलो नाहीत तर कंधार – लोहा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, व्यापारी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्नशील राहणार असल्याचे देशमुख यांनी उपस्थित जनसमुदायाला ठणकावून सांगितले. कंधार शहरातील उध्वस्त झालेली बाजारपेठ, शेतक-यांना शेतीमालाला मिळणारा तुटपुंजा भाव, मजुरांना मिळणारी अल्पमजुरी, तरुण बेरोजगारांना हातांना काम नाही, या तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असून, सिंचनाचे व्यवस्थापन व्यवस्थित नाही, त्यासाठी काँग्रेस पक्षाचे भावी दोन्ही खासदार यांच्या माध्यमातून हा भाग सिंचनाखाली आणून सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील असेल, त्याचबरोबर कंधार शहरातील पर्यटन स्थळाचा दर्जा वाढवून शेतक-यांना शासन नियमाप्रमाणे हमीभाव देण्याचे वचनही आमचे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जाहीरनाम्यातून दिले आहे.
कंधार तालुक्यात विविध प्रश्न असून ते काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार आपण बहुमताने निवडून दिल्यास येथील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही विशेष लक्ष घालून प्रयत्नशील राहू, असे जाहीर सभेत अमित भैया देशमुख यांनी बोलून दाखविले आहे. या जाहीर सभेस कंधार तालुक्यातील महिला व पुरुष मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे दिसून आले.