नागपूर : प्रतिनिधी
मंत्रिमंडळाच्या यादीत माझे नाव शेवटपर्यंत होते. पण ऐनवेळी नाव कट झाले त्यामुळे नाराजी नक्कीच आहे, असे विजय शिवतारे म्हणाले. महाराष्ट्रात कर्तृत्वावर काम केले, यावर जे सर्व चालायचे ते आता आपण आता बिहारकडे जात आहोत . बिहार जे आज आहे ते जातीयवादावर राजकारण आहे.
आपण सगळे तिकडे जातोय, अशी टीका शिवतारे यांनी करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
दरम्यान, महायुती सरकारचा शपथविधी पार पडताच अनेक नेत्यांची नाराजी उफाळून आली आहे. या आमदारांकडून आता पक्षाच्या नेत्यांवर उघडपणे टीका केली जाऊ लागली आहे. शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता तोफ डागली आहे. आपल्याला चांगली वागणूक मिळाली नसल्याचा प्रचंड राग आल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाले. त्याआधी रविवारी ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवतारे यांचा या यादीत समावेश नसल्याने शिवतारेंनी मीडियाशी बोलताना यावरून नाराजी व्यक्त केली. आता अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळाले तरी मी घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
शिवतारे म्हणाले, अडीच वर्षानंतर मंत्रिपद मिळालं तरी मी घेणार नाही. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही पण मिळालेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे. काहीतरी सौजन्य असायला हवे. कार्यकर्ते अडचणीत असताना, विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात महायुतीचे उमेदवार दिलेले असताना कुणीच नेते बोलायला तयार नव्हते, असे शिवतारे यांनी म्हटले आहे.
माझ्यासाठी मंत्रिपद महत्वाचे नाही. माझे एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे झालेले नाही. मी हावरा नाही. पण ज्यापध्दतीने वागणूक मिळाली, हे चुकीचे आहे. मंत्रिमंडळात विभागीय समतोल ठेवण्यापेक्षा जातीय समतोल ठेवला. महाराष्ट्र चाललाय कुठे? पूर्वी विभागीय नेतृत्व दिले जायचे. तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त माणसांच्या हाती सत्ता देत महाराष्ट्र पुढे नेला होता. त्यामुळे आता आपण कुठे तरी मागे चाललोय, बिहारच्या दिशेने चाललोय, असे शिवतारे म्हणाले आहेत.
मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे. मी त्यांच्यासाठी काम करत राहीन. मुख्यमंर्त्यांकडून मतदारसंघातून कामे करून घेणार असल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मात्र शिवतारे यांनी बोलणे टाळले. त्यांच्याविषयी नाराजी आहे किंवा नाही, याबाबत त्यांनी मौन बाळगत आपण त्यांच्यावर नाराज असल्याचे संकेत दिले.
अडीच वर्ष मंत्रिपद घेणार नाही
मला अडीच वर्ष मंत्रिपद दिले तरी मी घेणार नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम व्हायला हवे होते.
कार्यकर्ते गुलाम नाही. अडीच वर्ष मंत्रिपद मिळालं तरी मला ते नको, असे म्हणत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. शेवटपर्यंत नाव होतं पण ऐनवेळी नाव कट झालं, त्यामुळे नक्कीच नाराजी आहे. विश्वासात घेऊन सर्व व्हायला हवं होतं, असेही शिवतारे म्हणाले.