किल्लारी : वार्ताहर
बाणेगाव ते लिंबाळा (दाऊ) रस्त्यावर सध्या रात्रीच्या वेळेस अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार या मार्गावरून महिलांचा व विद्यार्थिनींचा प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. याबाबत सोमवार दि १४ रोजी ग्रामस्थांच्या वतीने किल्लारी पोलिसांना निवेदन देण्यात आले.
अनेक वेळा लिंबाळा, बाणेगाव परिसरातील महिलांना कामानिमित्त किंवा अन्य कारणाने दिवसा रात्री प्रवास करावा लागतो. मात्र या मार्गावर रात्रभर अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेक ठिकाणी गर्दी, गोंधळ व मद्यधुंद अवस्थेतील लोक आढळतात. यामुळे शाळकरी मुली, महिलांना त्रास सहन करावा लागतो, तसेच गैरप्रकार व छेडछाडीच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्यालगत देशी, विदेशी दारूची खुलेआम विक्री होते. विशेषत: रस्त्याच्या काही वळणांवर, रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे बाटल्या विकल्या जातात. यावर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असून, पोलिसांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.
बाणेगाव ते लिंबाळा रस्त्यावर रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात यावी, अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, महिलांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी आदी मागणीचे निवेदन किल्लारी येथील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनावर रजनीश कांबळे, रवींद्र तौर, वाघम्बर भीमराव कांबळे, महावीर कांबळे यांच्यासह बानेगाव ग्रामस्थांची नावे आहेत.

