लातूर : प्रतिनिधी
कोलकत्ता येथील ओ. पी. शहा यांना ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष व विवेकवादी चळवळीचे अग्रणी कार्यकर्ते माधव बावगे (लातूर) यांना ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर, अॅड. असीम सरोदे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, सोमनाथ रोडे आणि डॉ. अशोक बेलखोडे उपस्थित होते.
‘१९८५ साली बाबा आमटे यांची भारत जोडो यात्रा निघाली नसती, तर देशात मोठा सामाजिक कलह निर्माण झाला असता. आज हिंदू-मुस्लिम द्वेष ज्या वेगाने वाढतो आहे, त्या पार्श्वभूमीवर बाबांच्या विचारांची पुन्हा नितांत गरज आहे,’ असे ठाम प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांनी केले. बाबा आमटे यांच्या मानवतावादी विचारांचा वारसा पुढे नेणा-या ‘बाबा आमटे एकता अभियान’ तर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक सलोखा, विवेकवाद आणि माणुसकी जपण्याचा ठाम संदेश देण्यात आला.
या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये रोख, शाल, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे होते. कार्यक्रमाला सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात माधव बावगे म्हणाले, हा पुरस्कार माझा वैयक्तिक नाही, तर माझ्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. आम्ही बाबा आमटे यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राज्यभर वेगवेगळ्या विषयांवर चळवळ उभी केली. त्या कार्याला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यातून दीर्घकाळ टिकणारे समाजकारण उभे राहिले. या पुरस्कारामुळे विज्ञाननिष्ठ, विवेकी समाज घडवण्याच्या आमच्या लढ्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. माधव बावगे यांनी पुरस्काराची ५० हजार रुपयांची रक्कम भारत जोडो युवा अकादमी या विश्वस्त संस्थेस सुपूर्द केली.
यावेळी सचिव डॉ. अशोक बेलखोडे, सहसचिव नफिसा कोलंबोवाला, कोषाध्यक्ष गिरीश पदमावार यांच्यासह संस्थेचे राष्ट्रीय प्रतिनिधी, जेकब नेल्लीथानम, अनिल हेब्बर, विजय भारतीया, सुजाता राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पुरस्कारासाठी सहकार्य करणा-या चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिंदे व संचालक मंडळाच्या सदस्यांचा सत्कार मान्यवारांच्या हस्ते करण्यात आला.

