मुंबई : प्रतिनिधी
राज्यात जुलैमध्ये सर्वदूर पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये महिन्यात पावसाचे प्रमाण कमीच होते. सप्टेंबरमध्येही पावसाने ओढ दिल्याने ५२ टक्के पावसाची तूट निर्माण झाली. मोसमी पावसाचा हंगाम बुधवारी संपला असून संपूर्ण हंगामात राज्यात (१ जुन ते ३० सप्टेंबर) पावसाची तूट १९ टक्के इतकी आहे. सध्या राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असली तरीही शुक्रवारपासून वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे.
यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र झाले आहेत. मोसमी पावसाच्या सुरुवातीपासूनच राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव होता. यंदाच्या संपूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या स्थितीचा प्रभाव असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. जून महिन्यातही सरासरीहून कमी पाऊस झाला. त्यानंतर जुलै महिन्यात सक्रिय हवामान प्रणालींमुळे राज्यात सरासरीहून अधिक आणि सर्वदूर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर ओसरला, तसेच या महिन्यात सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यताही पावसाने ओढ दिल्याने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि कोकण प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची मोठी तूट कायम राहिली. राज्यात सप्टेंबरमध्ये १८०.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो, यंदा यादरम्यान ८७ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुष्काळाची झळ अधिकच तीव्र झाली.
















