औसा : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांनी औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना हक्काचा कारखाना सुरू करून शेतक-यांच्या जीवनात आर्थिक उन्नती घडविण्यासाठी तालुक्यातील बेलकुंड येथे संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी विलासराव देशमुख यांचा पुतळा कारखाना स्थळी उभा करण्याचा निर्णय कारखान्याच्या २४ व्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
औसा येथील विजय मंगल कार्यालयात संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची २४ वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी मंचावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीपतराव काकडे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनकर माने, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, माजी व्हाईस चेअरमन उदयंिसह देशमुख, सुग्रीव लोंढे , शिवाजी पाटील रामेगावकर, बालाजी बिराजदार, विद्या पाटील, सचिन दाताळ, संचालक गणपती संभाजी बाजुळगे, रमेश वळके, शामराव साळुंके, भरत एकनाथ माळी/फुलसुंदर, गोंिवद सोनटके, विलास काळे, संतोष भोसले, अनिल पाटील, सौ निवेदिता चंद्रसेन पाटील, सौ शुभांगी शिवाजी बिराजदार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव, कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, जागृतीचे जनरल मॅनेजर येवले, कचेश्वर चे जनरल मॅनेजर श्री वाकडे, जागृतीचे शेतकी अधिकारी कदम आदी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. काकडे यांनी दररोज २५०० मेट्रिक टनाचे गाळप होईल अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली असून मजुराअभावी ऊसतोडणीची अडचण होऊ नये यासाठी कारखान्याचे १० हार्वेस्टर राहतील यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त ऊस कार्यक्षेत्रातील साखर कारखान्याला द्यावा जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने सुरू झाले असून शेतक-यांनी ऊसाची अधिकाधिक लागवड करावी या वर्षीच्या हंगामातील शेतक-यांना एफआरपी प्रमाणे ऊसाचे बील अदा करण्यात येत असून यापुढेही अधिकचा भाव देण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी चेअरमन माने म्हणाले की, साखर कारखाना काटकसरीने चालवत कमीतकमी संख्या बळावर तो कसा चालेल याचा विचार करून सभासदांना व कामगारांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून कारखाना व सभासद दोन्ही जीवंत राहिले पाहिजेत संचालक मंडळाने दिलेल्या दरात आणखी वाढ करून ऊस उत्पादक शेतक-यांना अधिकचा भाव देण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगितले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उटगे म्हणाले की, माजीमंत्री दिलीपराव देशमुख व आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अडचणीत असलेला संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज कारखाना स्वत: च्या पायावर उभा राहत असून नवीन संचालक मंडळाच्या माध्यमातून डिस्डलरी हा उपपदार्थ उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या प्रास्ताविकात कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील यांनी कारखान्याचा लेखा जोखा मांडला. यावेळी सभासद, शेतकरी, कामगार उपस्थित होते.