मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी बनावटीच्या सोन्याची तस्करी करणारे संघटित जाळे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उद्ध्वस्त केले.
कारवाईत ३.४७ किलो सोन्याची धूळ मेणाच्या आठ कॅप्सूलमध्ये लपवून आणल्याचे उघड झाले. जप्त सोन्याची किंमत ५ कोटी ४७ लाख आहे. विमान कंपनीचे कर्मचारी, परदेशातून येणारे प्रवासी यांच्या संगनमतातून तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.
डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला मिळालेल्या विशिष्ट माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर एका विमान कंपनीच्या कर्मचा-यावर अधिका-यांनी पाळत ठेवली. संबंधित कर्मचारी विमानतळापासून सुमारे ५० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्याला अडविण्यात आले. त्याची झडती घेतली असता सोन्याची धूळ असलेल्या मेणाच्या तीन कॅप्सूल आढळल्या.
चौकशीत या कर्मचा-याने विमानतळाच्या संक्रमण कक्षात एका प्रवाशाकडून सोने घेतल्याची माहिती दिली. दरम्यान, विमानतळांवर सोने तस्करी वाढली आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
















