मुंबई : प्रतिनिधी
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाने गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या तुटवड्याचा परिणाम आता थेट स्वयंपाकघरावर झाला असून गॅस मिळत नसल्याने अनेक गृहिणी इलेक्ट्रिक शेगडीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडींची मागणी अचानक वाढली असून महिलांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे.
यापूर्वी घरगुती गॅस संपल्यानंतर दुस-याच दिवशी एजन्सीकडून सिलिंडरचा पुरवठा होत होता. मात्र सध्या परिस्थिती बदलली असून सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांवरच नाही तर व्यावसायिकांवरही झाला आहे. हॉटेल आणि खानावळ चालवणा-या व्यावसायिकांना देखील गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याचेही समोर येत आहे.
स्टॉकही कमी पडू लागला
दरम्यान, या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून इलेक्ट्रिक शेगडी हा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला जात आहे. कल्याण परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगडींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी स्टॉकही कमी पडू लागला आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत इलेक्ट्रिक शेगडींची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

