मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील एकूण शाळांपैकी ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक उपलब्ध असून १ लाख ८ हजार ४४४ शाळांमध्ये संगणक वापराचे प्रमाण ७२.९५ टक्के, असा दावा शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे.
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ ०.८१ टक्के इतक्या शाळांचेच सर्वेक्षण केलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८ हजार १४४ शाळा आहेत. त्यापैकी केवळ ४०९ प्राथमिक आणि ४६३ उच्च प्राथमिक व त्यावरील ग्रामीण भागातील ८७२ शाळांचेच सर्वेक्षण संबंधित संस्थेकडून करण्यात आले आहे. राज्यातील एकूण २,०९,६१,८०० शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण संस्थेने केले आहे जे की एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ ०.१६ टक्के इतके आहे.
वय वर्ष ६ ते १४ मधील ६०.९ टक्के बालके ही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर ३८.५ टक्के बालके ही खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली व दुसरीमधील वाचन व गणितीय क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर हा वाढला आहे.
शासकीय शाळांमध्ये सन २०२२ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये वाचनामध्ये १०.९ टक्के प्रगती दिसून येते. तर खासगी शाळांमध्ये वाचनामध्ये ८.१ टक्के प्रगती दिसून येते. गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये १३.१ टक्के प्रगती दिसून येते व खासगी शाळांमध्ये ११.५ टक्के प्रगती दिसून येते.
वाचनात प्रगती
इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे. इयत्ता तिसरीमध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. २०२२ च्या तुलनेमध्ये २०२४ मध्ये यात १३ टक्क्यांची वाढ दिसून येते.
९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन
वय वर्ष १४ ते १६ मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धतामध्ये राज्यातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील ८४.१ टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यामधील १९.२ टक्के विद्यार्थ्यांनी स्वत:चा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील ६३.३ टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, तर विविध सामाजिक माध्यमांसाठी ७२.७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.