पुणे : प्रतिनिधी
यंदा राज्यात अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यातच येत्या काही दिवसात उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. याची चाहूल लागण्यास सुरवात झाली असून सध्या राज्यातील अनेक शहरांमधील तापमान हे ४० अंशाच्या वर पोहचले आहे.
दरम्यान, सध्या मार्च महिना सुरू असून फेब्रुवारीपासूनच राज्यात उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. दिवसभर उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशाच्यावर पोहचले आहे. पुढील काही दिवस तापमानाचा पारा अशाच प्रकारे वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी; असे आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे
अकोल्यात कोरडी हवा
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सियस तापमान पार गेले आहे. आजही अकोल्याचे तापमान ४० अंश पार आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय कोरडी हवा वाहणार आहे.
पुण्याचा पारा चाळीशी पार
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान राजगुरूनगर येथे ४०.७ अंश सेल्सिअस एवढी नोंद झाली आहे. असून शिरूर आणि तळेगाव ढमढेरे येथील कमाल तापमान ४० च्या पुढे नोंदविले गेले. मार्च महिन्याच्या दुस-याच आठवड्यात जिल्ह्यातील कमाल तापमानाने ४१ अंशापर्यंत मजल मारली असून आज दिवसभर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत होती.
जळगावातही जाणवताय उष्ण लाटा
जळगाव जिल्ह्यात देखील तीन- चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याची झळ जाणविण्यास सुरवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याने पारा ४० अंशाच्या दिशेने जात आहे. आज जळगावमधील तापमान ३९.४ अंश सेल्सिअसवर होते.
विदर्भातील तापमान ४० अंश पार
होळीनंतर तापमानात वाढायला सुरवात होत असते. मात्र आताच तापमानाचा पारा हा ४१ अंशाचा घरात जाऊन पोहचला आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून ११ पैकी ६ जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दरम्यान काल अकोल्यात सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तर अकोला, ब्रम्हपुरी, चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगाने वाढत आहे.
नाशिककरांना उन्हाचे चटके
नाशिक जिल्ह्यात देखील मार्च महिन्यातच पारा ३८.७ अंशावर पोहचले आहे. तापमानात वाढ झाल्याने नाशिककरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून नाशिकच्या तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये सर्वाधिक ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा वाढला
धुळ्यात देखील तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढला असून वाढत्या उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन करावा लागत आहे. आज धुळ्यात ३९ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.