लातूर : प्रतिनिधी
शहराच्या गंजगोलाईत असलेल्या सराफ लाईनमधील एका लॉजवर परस्पर संमतीने अश्लील चाळे करणा-या पाच जोडप्यांना गांधी चौक पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले होते. यातील दोन तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्वजण सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेत, समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
लातूर शहरातील लॉजेसवर सर्रासपणे अश्लील चाळे करणा-यांना आसरा देण्यात येतो. अनेक देहविक्रय करणा-या महिलांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींनाही अशा लॉजेसमध्ये सहज जागा उपलब्ध करून देण्यात येते. शनिवारी शहरातील गंजगोलाईच्या सराफ लाईनमध्ये असलेल्या एका लॉजवर चाळे करण्यासाठी काही गेले होते. त्याचवेळी गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या लॉजवर धाड टाकली. यावेळी पाच जोडपे आपापल्या खोल्यांमध्ये अश्लील चाळे करताना आढळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गांधी चौक पोलीस ठाण्यात आणले. दिवसभर तेथेच बसवून घेत, प्रत्येकाच्या नातेवाईकांना ठाण्यात बोलावून घेण्यात आले. यातील सर्वच तरुण-तरुणी सज्ञान असल्याचे सिध्द झाल्याने त्यांना समज देऊन नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्यासह गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी तरुण-तरुणींसह पालकांनाही धारेवर धरत यापुढे असे कृत्य केले तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देऊन सोडून देण्यात आले.