मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या घटकांमध्ये जरी निवडणूक होणार असली तरी काही लहान पक्ष आणि लोकनेते या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत दोन मोठ्या घटकांपैकी एकाची सत्ता स्थापन होऊ शकते. भाजपप्रणीत महायुती आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी हे या निवडणुकीचे दोन मोठे घटक आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन मोठ्या घटकांमध्ये जरी निवडणूक होणार असली तरी काही लहान पक्ष आणि लोकनेते या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. हे लहान पक्ष वेळ पडल्यास किंगमेकरची भूमिका देखील बजावू शकतात.
असदुद्दीन ओवेसचिंा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम), राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकतात किंवा किंगमेकर देखील ठरू शकतात.
लहान पक्ष आणि अपक्षांना जवळपास ३० जागा मिळू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात त्रिशंकू लढत दिसली तर हे आमदार निर्णायक भूमिका बजावतील. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला २८८ सदस्यीय विधानसभेसाठी मतदान होत असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
२०१९ ची होणार पुनरावृत्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत, लहान पक्षांनी २९ जागा जिंकल्या आणि त्यांचे उमेदवार ६३ मतदारसंघांत उपविजेते ठरले, यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठ्या पक्षांची धाकधूक अधिकच वाढली आहे. महाराष्ट्रात, बहुतेक मतदारसंघांमध्ये सुमारे ४ लाख मतदार आहेत, आणि काही मतदारसंघांमध्ये सुमारे ३ लाख आहेत. सरासरी ६० टक्के मतदानासह, प्रत्येक मतदारसंघात अंदाजे २.५ लाख मतदान होईल. मतविभाजनामुळे प्रत्येक जागेवर सुमारे एक लाख मते विजयी करू शकतात.
२५-३० जागा अपक्ष, छोट्या पक्षांना
मागील निवडणुकांच्या तुलनेत महाराष्ट्रातील राजकारण अधिकच विस्कळीत आणि गुंतागुंतीचे झाले आहे. अनेक मतदारसंघांत मोठ्या पक्षांना बंडाळीची झळ देखील सहन करावी लागली आहे. सुमारे २५ ते ३० जागा अपक्ष आणि छोट्या पक्षांना मिळण्याची अपेक्षा आहे, जे निर्णायक ठरू शकतात.
मनसेची भूमिका अस्पष्ट
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा तिसरा खेळाडू म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मनसे मुंबईत २५ जागा लढवत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात किमान ३६ विधानसभा जागांवर तो महत्त्वाचा घटक असेल अशी अपेक्षा आहे.