केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून बोलावण्याचा प्रस्ताव दिला आहे. या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी विशेष अधिवेशनाबद्दल माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना अनुक्रमे ३० नोव्हेंबर (सोमवार) आणि २ डिसेंबर (बुधवार) रोजी दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची विनंती सरकारने केली आहे. या अधिवेशनात आवश्यक सरकारी कामकाज पार पाडले जाणार आहे. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे अधिवेशन ३ डिसेंबर २०२६ रोजी संपण्याची शक्यता आहे. हे विशेष अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचा विस्तार असेल. संसदेचे कामकाज १३ ऑगस्ट रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते. मात्र, अधिवेशन अद्याप औपचारिकरीत्या समाप्त करण्यात आलेले नाही. विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
त्यात मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक व त्या संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमत जुळवण्याच्या प्रयत्नात आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी सरकारसमोर संख्याबळाचे आव्हान आहे. घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत दोन तृतीयांश म्हणजेच ३६१ मतांची गरज आहे. ३ जागा रिक्त असल्यामुळे सध्या सभागृहात ५४० सदस्य आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) ३२० सदस्य आहेत. त्यामुळे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेबाबत दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करण्यासाठी सरकार राज्यनिहाय लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याच्या सूत्रावर विचार करत असल्याचे सांगितले जाते. प्रस्तावित आराखड्यात १९७१ च्या जनगणनेनुसार राज्यांमधील जागांचे विद्यमान प्रमाण कायम ठेवण्याचाही विचार आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव या घटनादुरुस्ती विधेयकात आहे. विधेयक मंजुरीसाठी विरोधी पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. एप्रिलमध्ये विधेयक फेटाळले गेल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. विरोधी गटातील २६ खासदार सत्ताधारी आघाडीकडे आले आहेत. तृणमूल काँग्रेसचे २० बंडखोर नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन झाले असून, त्यांनी एनडीएला पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे सरकारची स्थिती मजबूत झाली असली तरी विधेयक मंजुरीसाठी आणखी काही खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
द्रमुकचे २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (श. प.) आठ खासदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. राष्ट्रवादी काँगे्रस (श. प.) व द्रमुक या पक्षांनी दुरुस्तीसह आणल्या जाऊ शकणा-या विधेयकाला विरोध दर्शवलेला नाही. याशिवाय आप, राष्ट्रीय जनता दल आदी विरोधी पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तर केंद्र सरकारला घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमवता येऊ शकते असे म्हटले जाते. केंद्र सरकारने अधिवेशन संस्थगित होऊन शंभराहून जास्त दिवस झाले तरी पावसाळी अधिवेशनाची समाप्ती केली नसल्याने ‘विशेष अधिवेशन’ बोलावले जाऊ शकते असा अंदाज होता. संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संस्थगित करण्यात आले होते. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा केली नव्हती. त्यामुळे सोमवारी सुरू होणारे चार दिवसीय अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचाच भाग असेल. खरे पाहता, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र, यावेळी पावसाळी अधिवेशनच पुनर्स्थापित करण्यात आले आहे.
















