अजित पवार यांच्या विमान अपघाताला साडेनऊ महिने उलटूनही तपासात ठोस माहिती समोर आलेली नाही. विमान कंपनी व्हीएसआरचे प्रमुख व्ही. के. सिंग आणि त्यांचे पुत्र रोहित सिंग यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध असल्याने ते कंपनीला वाचवत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.‘व्हीएसआरला वाचवणारा मफलर मॅन म्हणजे देवेंद्र फडणवीस’ अशी टीकाही त्यांनी केली. जयपूरमध्ये नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या रोहित सिंग याच्या विवाह सोहळ्याला फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे रोहित पवार यांची संशयाची सुई फडणवीसांच्या दिशेने फिरू लागल्याचे दिसते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर विमान कंपनी आणि मालक व्ही. के. सिंग यांना वाचवणारा ‘मफलर मॅन’ म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस हेच आहेत, असे जाहीर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी सोमवारी खळबळ उडवून दिली.
मफलर घातलेला फोटो दाखवतानाच, फडणवीस यांचा या अपघातात हात आहे असे मी म्हणत नाही, असेही रोहित पवार म्हणाले. असे असले तरी या प्रकरणात थेट फडणवीसांनाच ओढल्यामुळे एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या अपघाती निधनासंबंधातील संभ्रम त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दहा महिन्यांनंतरही कायम आहे. हा विषय रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरला आहे. या अपघातासंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यापूर्वीच मांडले असून, हा अपघात नसून घातपातच आहे असा निष्कर्ष त्यावेळीच काढला होता. जर तो घातपात असेल तर तो घडवला कोणी हा यातला मुख्य मुद्दा आहे.
त्यामुळे त्या अनुषंगाने रोहित पवार नव्याने काय माहिती देतात याविषयी उत्सुकता होती. रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिशेने संशयाची सुई फिरवली आहे. रोहित पवार यांची पत्रकार परिषद होण्याआधी मुंबईत आणि पुण्यात काही ठिकाणी एका ‘मफलर मॅन’विषयी संशय व्यक्त करणारी पोस्टर्स जारी करण्यात आली होती. सस्पेन्स संपवताना रोहित पवार यांनी सनसनाटी पद्धतीने फडणवीस यांचा संशयित आरोपी व्यक्तींबरोबरचा मफलरमधला फोटो पत्रकारांना दाखवला. अजित पवार यांच्या ज्या विमानाला अपघात झाला ते विमान ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीच्या मालकावर रोहित पवार यांचा संशय आहे. त्या मालकाशी फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध असल्याचे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले. निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी जाहीर होणार होता त्या दिवशी फडणवीस या आरोपीशी संबंधित एका लग्न समारंभासाठी जयपूरला गेले होते. रोहित पवारांचे म्हणणे की, राज्याच्या निवडणुकांची धुरा ज्या व्यक्तीच्या खांद्यावर होती ती व्यक्ती निवडणूक निकालाच्या दिवशीच असे बाहेरगावी जाण्याची शक्यता नाही, तरीही फडणवीस गेले याचा अर्थ त्यांचा या संशयिताशी खूप निकटचा संबंध आहे आणि तेच त्यांना वाचवत आहेत. रोहित पवारांनी आरोप केले त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा पुण्यात होते. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांच्याकडे अजित पवार यांच्या अपघात चौकशीचे काम त्वरित पूर्ण व्हावे अशी मागणी केली. यातील दोषींना फासावर लटकवण्याचे मनोगतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. याद्वारे फडणवीस यांनी आपल्यावरील संशयाचे मळभ दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी मूळ विषयावरून निर्माण झालेले संशयाचे धुके पूर्णपणे दूर झालेले नाही.
अपघाताच्या चौकशीला होत असलेला विलंब हे यामागचे मुख्य कारण असून दुसरे एक मुख्य कारण म्हणजे, या प्रकरणात अद्याप महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआरसुद्धा दाखल केलेला नाही. एफआयआर नोंदवण्यासाठी केली जाणारी टाळाटाळ संशयाचे धुके अधिक गडद करणारी ठरते. या प्रकरणात एफआयआर दाखल व्हावा यासाठी रोहित पवार यांनी खूप आटापिटा केला पण त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी कर्नाटकात जाऊन तेथील काँग्रेस सरकारमार्फत या प्रकरणी एफआयआर नोंदणी केली. हा सारा तपशील वाचल्यानंतर लोकांच्या मनातही अनेक शंका उपस्थित होेणे साहजिक आहे. राज्याची महत्त्वाची व्यक्ती दगावली असताना त्या प्रकरणाच्या चौकशीत विलंब आणि हेळसांड होत असेल तर संशयाच्या सुईचे टोक अधिक टोकदार होणारच. त्यामुळे चौकशीला नुसता वेग येऊन चालणार नाही तर त्यातील नेमके सत्यही तातडीने समोर येणे गरजेचे आहे.
















