मुंबई : प्रतिनिधी
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियान यांचा जबाब सीबीआयकडून नोंदवण्यात आला. जवळपास चार तासांनंतर सतीश सालियन सीबीआयच्या कार्यालयातून बाहेर पडले असून लवकरच गुन्हा दाखल होईल, अशी माहिती सतीश सालियन याचे वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबई उच्च न्यायालयात सतिश सालियन यांनी याचिका दाखल केली होती, या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सारे रेकॉर्ड सीबीआयकडे हॅन्डओव्हर करण्याचेही निर्देश देण्यात आले असून मालवणी पोलिसांनी तपासाचे सर्व तपशील सीबीआयला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिल्याची माहिती दिशा सालियनच्या वकिलांनी दिली. आदित्य ठाकरे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टाने फोटाळल्यामुळे आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सुरू झाली आहे.
















