परभणी : पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या सिद्धेश्वर या जलाशयातून रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पूर्णा नदीच्या पात्रावरील सिद्धेश्वर जलाशयात रविवारी सायंकाळपर्यंत २४१.४०८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला.
वरच्या भागातून ५.३३५ वेगाने पाण्याचा येवा सुरू होता,प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या जलाशयातील ८८४२% उपलब्ध पाणीसाठा ओळखून रविवारी सायंकाळी सहा वाजता या जलाशयाचा सहा क्रमांकाचा दरवाजा ०.३ ने वर उचलला. या दरवाजातून ४९३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात करण्यात येऊ लागला.
दरम्यान पूर्णा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी पूर परिस्थिती ओळखून सतर्क रहावे असे आवाहन पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यानी तसेच परभणी व हिंगोली जिल्हा महसूल प्रशासनाने दिला आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या वरच्या भागातील येलदरी जलाशयात रविवारी सकाळी ४१.८६% पाणीसाठा उपलब्ध होता. पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून या प्रकल्पात सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.