नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आखातात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम देशातील इंधनांच्या दरांवरही होत आहे. कधी पेट्रोल-डिझेल, तर कधी एलपीजीच्या दरांमुळे सर्वसामान्यांचा खिसा कापला जात आहे. आता इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयजीएलने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलोमागे ३.८९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर शनिवार सकाळपासून लागू होणार आहेत. यामुळे राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर ८६.९८ प्रति किलोग्रॅम झाले आहेत. या दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येणार आहे.
आयजीएलने एका निवेदनात स्पष्ट केले आहे की, आखातातील संघर्ष पुन्हा वाढल्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील मालवाहतुकीवर सातत्याने परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून संकटपूर्व काळाच्या तुलनेत जागतिक स्तरावर एलएनजीच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. याशिवाय, हिवाळा तोंडावर आल्यामुळे युरोपला त्यांच्या नैसर्गिक वायूच्या साठ्यात वाढवण्याची घाई झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात पाच वेळा सीएनजीचे दर वाढले आहेत. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि गॅस वाहतूक विस्कळीत झाली आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल, सीएनजी, पीएनजीच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
















