सुधीर गो. बोर्डे
परभणी : दैनिक एकमत चा ३५वा वर्धापनदिन सोहळा दरवर्षीप्रमाणे दिमाखदार स्वरूपात पार पडला. शहरातील सर्व स्तरातील मान्यवर, वाचक आणि परभणीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याने सभागृह अक्षरश: गर्दीने फुलून गेले होते. सभागृहात जितकी गर्दी होती, तितकीच शुभेच्छुकांची गर्दी सभागृहाबाहेर उभी होती. उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि एकमत च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. यावेळी दिव्यांग बांधवांनी सभागृहाबाहेर आवर्जून उपस्थित राहत एकमत वरील अभिमान व आपुलकी दाखवली. ही गोष्ट कळताच एकमत चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांनी मंचावरून सभागृहाबाहेर येत दिव्यांग बांधवांशी आपुलकीने चर्चा करत स्विकारलेल्या शुभेच्छांमुळे हा प्रसंग उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.
परभणीतील श्री. शिवाजी महविद्यालयात बुधवार, दि.२६ ऑगस्ट रोजी एकमत च्या ३५व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छुकांच्या गर्दीत एक हृदयाला भिडणारा प्रसंग सर्वांना अनुभवायला मिळाला. शुभेच्छुकांच्या गर्दीमुळे सभागृहात प्रवेश करणे अवघड असल्यामुळे काही दिव्यांग बांधव एकमत परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी सभागृहाबाहेर थांबले होते. यावेळी त्यांच्या चेह-यावर एकमत बद्दलचा अभिमान आणि निस्सीम आपुलकीची भावना स्पष्ट दिसून येत होती. ही गोष्ट एकमत चे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांना समजताच त्यांनी मंचावरून खाली उतरून सभागृहाबाहेर येत दिव्यांग बांधवांची भेट घेतली. त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून शुभेच्छा स्विकारल्या. त्यांच्यासोबत उभे राहून आपुकीने संवाद साधत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. या भावनिक प्रसंगामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते. मानाचे पाहुणे, प्रतिष्ठित मान्यवरांसोबत एकमतने ख-या अर्थाने समाजातील वंचित घटकांच्या भावनांना दिले अग्रस्थान उपस्थितांसाठी भावनिक प्रसंग ठरला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी या घटनेचे कौतूक केले आणि एकमत ची हीच खरी ताकद असल्याचे सांगितले. पत्रकारिता ही फक्त बातम्यांपुरती मर्यादित नसून ती समाजाला जोडण्याचे, प्रत्येकाला सामावून घेण्याचे माध्यम आहे, हा संदेश या प्रसंगातून अधोरेखित झाला. वर्धापन दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात दिव्यांग बांधवांशी संपादकांनी साधलेला आपुलकीचा संवादच एकमत च्या सामाजिक बांधिलकीचा खरा पुरावा ठरला.
यावेळी एकमतचे जिल्हा प्रतिनिधी विश्वास गुंडावार, नगरसेवक अंबिकाताई डहाळे, माजी नगरसेवक नवनीत पाचपोर, विष्णू वैरागड, प्रगतशील शेतकरी महेंद्र फुटाणे, शेख जाफर तरोडेकर, सत्यम दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, राहुल शिवभगत, ज्ञानोबा भरोसे, सुरेश पाचपुंजे, ज्ञानोबा कदम, सय्यद आयास, गजानन दुधारे, बालाजी पौळ, रमेश खंडागळे, केशव सुर्यवंशी, सय्यद मोबीन, जलील पठाण, भगवान जल्हारे, सिध्दार्थ काळे व शेकडो दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.
















