परभणी : वक्फ कायदा विरोधाच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेली हिंसा आता भीषण रूप धारण करत असून, यामध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. मुर्शिदाबाद येथून सुरू झालेल्या या हिंसाचारात आतापर्यंत २०० पेक्षा अधिक हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्यात आली असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक महिलांवर अत्याचार झाले असून, तीन हिंदू नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
परिणामी, तब्बल ५०० हून अधिक कुटुंबांनी आपले घरदार सोडून येथून स्थलांतर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी दि.१९ रोजी विश्व हिंदू परिषद जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या ठिकाणी भडकलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडित कुटुंबांची भेट घेण्याऐवजी, काही वादग्रस्त इमामांची बैठक घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारवर हिंदूंना वा-यावर सोडल्याचा आणि जिहादी गटांना अप्रत्यक्ष साथ देण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये घडणा-या घटना पाहता या ठिकाणी तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी. संपूर्ण हिंसाचाराची सखोल चौकशी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) मार्फत करावी.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली द्यावी. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची ओळख करून त्यांना हाकलून देण्यात यावे. भारत-बांग्लादेश सीमेवर तातडीने कुंपणाचे काम सुरू करावे आदी मागण्यांचा राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात समावेश आहे.
विश्व हिंदू परिषद जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अनंतजी पांडे, ज्ञानोबा शिंदे,अभिजित असटूरकर,सुरेंद्र शहाणे, राजकुमार भांबरे, मनोज काबरा, शाम उदावंत, अभिजीत कुलकर्णी, बाळासाहेब जाधव, सुनील रामपूरकर, संजय रिझवानी गोकुळ डाड, गंगाधर फुटाणे,रुपेश स्वामी, सुनील मुलगीर, शशिकांत जोशी,रितेश जैन, विजय गायकवाड, श्रीकांत अंबुरे चंद्रशेखर देशमुख, लक्षिमीकांत देशपांडे, नाना शिरळेकर, विक्रम पुरोहित, नितीन खेकाळे, नंदकुमार तारे, रोहन धर्माधिकारी, अनिल देशमुख आदींच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.