चंबा : वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात बैरागढ-चंबा मार्गावर आज सकाळी ८ ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला. एक खासगी बस बैरागढहून चंबाकडे जात असताना, देविकोठीजवळील चालुज वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून खाली कोसळली आणि थेट १०० फूट खाली असलेल्या दुस-या रस्त्यावर जाऊन पडली.
प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात बसचालक आणि वाहकासह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जखमींपैकी सुमारे सात प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
‘शर्मा ट्रॅव्हल्स’ची बस सकाळी साडेसहाच्या सुमारास बैरागढहून चंबाकडे निघाली होती.
अवघे तीन किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर, चालुज वळणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे २० ते २५ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त बसमधून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी तिस्सा येथील रूग्णालयात दाखल केले.
















