पाथरी : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत १०२ रुग्णवाहिका चालकांना केवळ ६ हजार रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. या उलट प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वाहन चालकांना १८ हजार ६०० रुपये वेतन मिळत असल्याने त्यांच्यात तीव्र संताप पसरला आहे. या चालकांना मागील ५ महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळालेले नाही. समान स्वरूपाचे काम करूनही वेतनामध्ये असणारी तफावत अत्यंत अन्यायकारक असून या बाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विरोधात दि. ३० जुलै रोजी पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा येथे सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनापूर्वी सर्व चालकांच्या प्रलंबित मानधनाचा तात्काळ भरणा करावा. तसेच इतर चालकांप्रमाणे समान मानधन मंजूर करावे अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनात टी. एस. घांडगे, पी. ए. काकडे, व्ही. एम. ढोले, व्ही. डी. साखरे, डी. एस. कदम, आर.एन. देशमुख, जी.ए. ढवळे, एम.के. जाधव, पी.आर. यादव आणि बी.एस. मुंडे यांच्यासह सर्व चालक सहभागी होणार आहेत.
















