औसा : प्रतिनिधी
जिंदल समूहाचे संस्थापक कै. ओ. पी. जिंदल यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त जे.एस.डब्ल्यू. एनर्जीच्या वतीने तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर व मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) लातूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत थॅलेसिमिया, हिमोफिलिया, अॅनिमिया, अपघाती इ. रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी एकूण १०४ अधिकारी आणि कर्मचा-यांनी रक्तदान केले, यात लातूर येथे ३२, उमरगा २८, नांदेड १७, सोलापूर १५ आणि जालना मधील १२ सदस्यांचा सहभाग आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कै. श्री ओ. पी. जिंदल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी जे.एस.डब्ल्यू. एनर्जीचे तुषार पांडे, प्रितम गोरे, कु. निदा सोलकर, कु. अमृता राठोड, जनार्दन गुप्ता, संदेश घाटकर, समीर माथूर, परशुराम पाटील, अनिल पिसाळ तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे सिद्धेश्वर चौधरी तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. माधुरी मस्के, डॉ. राजश्री मिटकरे, धोंडीबा गोबाडे, अतिश मस्के आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्ण, अपघातग्रस्त तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी या वैद्यकीय महाविद्यालयात दररोज अधिकाधिक रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. संकलित रक्त शासनाच्या रक्तपेढीमार्फत गरजू रुग्णांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. आपल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त करीत रक्तदात्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सिद्धेश्वर चौधरी यांनी सध्याच्या रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर जे.एस.डब्ल्यूने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.















