लातूर : एजाज शेख
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने दिवाळीपुर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पिके उभी करण्यासाठी शेतक-यांनी खते, बियाणे, औषधे, मशागत आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. आता पिकांचे नुकसान झाल्याने कृषी सेवा केंद्रांचे दुकानदार उधारी वसूल करण्यासाठी तगादा लावत आहे. दिवाळीपूर्वी ही उधारी फेडण्याचा दबाव शेक-यांवर आहे. अशा परिस्थितीत ५ हजार रुपयांत उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. ५ हजार रुपये अग्रीम मदत जाहीर करुन सरकारने शेतक-यांची चेष्ठा केली आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या सरसकट मदतीच्या संदर्भाने सरकार पावले उचलेल आणि शेतक-यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्याची शेतक-यांची मागणी आहे. दिवाळीपुर्वी २५ हजार रुपयांची अग्रीम मदत द्यायला हवी होती. त्यानंतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करता आली असती. पण सरकारला शेतक-यांना मतद द्यायची नाही.
शेतक-यांना मदत केल्याचा फक्त आव आणला जात आहे. मुळात सरकार शेतक-यांसाठी थातूरमातूर उपाययोजना करत आहे. शेतकरी केवळ यंदाच्या संकाटने त्रस्त नाही, तर पुढचे वर्ष कसे जगायचे, या चिंतेत आहे.
भीक नको, हक्काचा पीक विमा द्या
५ हजार रुपयांत कसली आली दिवाळी. दिवाळी फक्त सरकारची आहे. शेतक-यांचा शिमगा. शेतक-यांना भीक नको, हक्का पीकविमा द्या. दुष्काळ म्हणून तातडीची मदत द्यायला हवी होती. सरकार म्हणून दानत असेल तर हेक्टरी एक लाख रुपये द्यायला हवे. शेतक-यांसाठी आम्ही काहीं तरी करीत आहोत, एवढेच दाखवण्यासाठी ५ हजाराचे अग्रीम जाहीर केले बाकी काहींही नाही.
– सत्तार पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना.
शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना ५ हजाराचे अग्रीम जाहीर करुन दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. खरे तर ५ हजारात काहींच होत नाही आणि तेही हातात पडेपर्यंत काहींही खरे नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्त अद्याप मिळालेले नाहीत. मागच्या वर्षी अतिवृष्टीत खरडून गेलेल्या शेतजमीनीचे पैसे मिळाले नाहीत. पुढचे पाठ मागणे सपाट, अशी या सरकारची गत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीच स्वत:चा शब्द फिरवणार असतील तर इतर मंत्र्यांचे काय?
– राजेंद्र मोरे, कोअर कमिटी सदस्य, क्रांतीकारी शेतकरी संघटना.
सरकारने शेतक-यांच्या इज्जतीचा केला पंचनामा
दुष्काळात करपून गेलेल्या पिकांचा पंचनामा करीत करीत सरकारने ५ हजार रुपये अग्रीम जाहीर करुन शेतक-यांच्याही इज्जतीचा पंचनामा केला आहे. यंदा शेतक-यांची दिवाळी त्रासदायक ठरणार आहे. खर्डा-भाकरीवर दिवाळी करण्याची वेळ आली आहे. ही शोकांतिका आहे.
– अरुण कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष क्रांतीकारी शेतकरी संघटना.















