जळकोट : प्रतिनिधी
पावसाळा सुरू होताच सापांचे मानवी वस्त्यांमध्ये दर्शन वाढू लागले असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू येथे कामाजी केंद्रे यांच्या घराच्या अंगणात गुरुवारी सकाळी अतिविषारी घोणस जातीचा साप आढळून आला. त्यांनी तत्काळ वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी, लातूर अंतर्गत कार्यरत सर्पमित्र अमोल शिरूरकर, गोरख खेडकर आणि रवी शिंदे यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच सर्पमत्रिांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि कोणतीही इजा न करता घोणस सापाला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ताब्यात घेतले. सर्पमिािांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला. घोणस हा साप उंदीर, बेडूक, पक्षी आणि पक्ष्यांची अंडी खात असल्याने उंदरांच्या संख्येवर नैसर्गिक नियंत्रण ठेवतो. त्यामुळे शेतक-यांचा मित्र म्हणून त्याची ओळख आहे. सर्पमित्र अमोल शिरूरकर यांनी सांगितले की, पावसाळ्यात साप बिळातून बाहेर येत असल्याने शेतात किंवा घर परिसरात त्यांचे दर्शन होण्याचे प्रमाण वाढते. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षीत सर्पमित्रांना संपर्क करावा. साप दूध पितो, नागीण बदला घेते, नागमणी असते अशा अनेक समजुती चुकीच्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांपासून अमोल शिरूरकर, गणेश कोल्हे, दयानंद हाक्के, दीपक जाधव, सोहेल शेख, रमजान शेख आणि त्यांच्या सहका-यांचा सर्पमित्र गट विनामूल्य वन्यजीव बचावाचे कार्य करीत आहे. परिसरात साप किंवा जखमी वन्यप्राणी आढळल्यास ७७०९७७९७९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
















